राजकीयदृष्ट्या सजग असणे हे केव्हाही जिवंतपणाचेच लक्षण मानायला हवे. या वयात आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. याच वयात आपली राजकीय विचारसरणी देखील विकसित होत असते. वेगाने अवतरणारे नवनवे तंत्रज्ञान, जगभरावर असलेले मंदीचे सावट आणि बिघडत्या पर्यावरणाचे आव्हान अशा अनेक घटकांमुळे आजची तरुणाई संभ्रमावस्थेत आल्यास त्यांना दोष देता येणार नाही.
गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात जे काही उठाव झाले, सामाजिक क्रांतीचे पाऊल पुढे पडले त्या सर्व घडामोडींमध्ये तरुणाईच आघाडीवर होती हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना लागलीच कळून येते. नव्वदीच्या दशकाच्या आधी बव्हंशी देशांमधील राज्यकर्ते हे दुसर्या महायुद्धाच्या सुमारास जन्माला आलेले होते. आता मात्र संपूर्ण जगताचा चेहरामोहरा कमालीच्या वेगाने बदलत असून सर्वत्र तरुणाईच आघाडीवर असल्याचे दिसून येते. भारत देखील त्याला अपवाद नाही. नव्या सहस्रकाची दोन दशके उलटून गेल्यावर आपला भारत देश नव्या उमेदीने जागतिक स्पर्धेला तडफेने सामोरा जात आहे. तब्बल 60 टक्क्याहून अधिक तरुणांचा सहभाग असलेली भारताची 130 कोटींची लोकसंख्या हे भारताचे शक्तिस्थानच म्हटले पाहिजे. परंतु हेच शक्तिस्थान म्हणजेच भारताची तरुणाई आज अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. देशभरातील अनेक विश्वविद्यालयांच्या आवारात काहिशी अस्थिरता आहे. करिअरचा विचार करून पुढे जायचे की राजकीय विचारसरणींच्या संघर्षामध्ये पडून बदल घडवण्याचा प्रयत्न करायचा अशा संभ्रमात देशातील विद्यापीठे अस्थिर झालेली दिसतात. राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो किंवा जामिया मिलिया विद्यापीठ, अलीगढ विद्यापीठ असो किंवा बनारस हिंदू विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांमधील तरुणाई विविध प्रकारच्या आंदोलनांनी गेली दीड-दोन वर्षे अक्षरश: धुमसत आहे. सामान्य जनांना असा प्रश्न पडणे साहजिकच आहे की ही मुले इतकी प्रखर आंदोलने सदा सर्वकाळ करत असतात तर ती अभ्यास केव्हा करत असतील? त्यांच्या करिअरचे काय होईल? विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जायचे असते की आपली राजकीय सक्रियता दाखवण्यासाठी? यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडते की बिघडते? यांसारखे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे साहजिकच आहे. अनेक गावांतील श्रमिक व कष्टकर्यांची मुले मोठ्या काबाडकष्टाने उच्च शिक्षण घेऊन आपली कारकीर्द घडवित असतात. स्वत:च्या उत्कर्षाला आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देशाच्या उभारणीला कारणीभूत ठरत असतात. ‘आधी शिकून मोठे व्हा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सल्ला शिरोधार्य मानून अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपापली कर्तृत्वे उजळली आहेत. सध्या आंदोलनांमुळे गाजत असलेल्या जेएनयूमध्ये तब्बल साडेसात हजार विद्यार्थी विविध शाखांमधून उच्च शिक्षण घेत आहेत. त्यापैकी किती विद्यार्थ्यांना आंदोलनांमध्ये रस आहे? सततच्या आंदोलनांनी कंटाळलेल्या काही विद्यार्थ्यांनी जेएनयूसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातून काढता पाय घेतल्याचे वृत्त आहे. तशा प्रकारच्या बातम्या आणि मुलाखती वृत्तवाहिन्यांवर देखील दिसून येतात. किंबहुना, विद्यार्थी वर्गाची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी राज्यकर्त्यांनी विद्यार्थी केंद्रित अभिनव उपक्रम हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ही कोणा एका राजकीय पक्षाची जबाबदारी नाही. विद्यार्थ्यांचा उत्कर्ष आणि त्यांच्या भविष्याची जडणघडण ही सर्वपक्षीय जबाबदारी मानणे गरजेचे आहे. तारुण्य ज्वालाग्राही असते. ते जपूनच हाताळावयास हवे. राजकीय पक्षांनी याचे भान ठेवायला हवे आहे.