Breaking News

‘जमीन घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दिल्लीतील जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वड्रा यांची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात केवळ वड्राच नव्हे तर श्रीमती वड्रा आणि त्यांचे मेहुणे राहुल गांधी यांचाही समावेश आहे, किंबहुना या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे, तसेच राहुल गांधींनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, गेल्या 24 तासांमध्ये विविध माध्यमांतून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. याद्वारे या घोटाळ्यामध्ये गांधी-वड्रा कुटुंबाने कशाप्रकारे कौटुंबिक भ्रष्टाचार केला आहे हे दिसते. गांधी कुटुंब हे भ्रष्टाचाराचे फॅमिली पॅक आहे. रॉबर्ट वड्रा यांची सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे, मात्र आता तपास पथकांनी माध्यमांतील या माहितीवरही गांभीर्याने विचार करीत त्यातील तथ्ये तपासावीत आणि आपल्या कामात भर घालावी. याप्रकरणी एच. एल. पावा यांना सी. सी. थंपी यांनी फायनान्स आणि मदत केली होती. चौकशीतही थंपी आणि पावा यांच्यामध्ये 54 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यूपीए सरकारच्या काळात थंपी यांचे नाव केवळ पेट्रोलियम डीलसोबतच नव्हते तर दिल्लीमधील जमीन घोटाळ्यात आर्थिक घोटाळ्यातही नाव आहे. 280 कोटींचा हा घोटाळा आहे. दरम्यान, थंपी आणि आर्म डीलर संजय भंडारी यांचे नाते सर्वश्रृत आहे. तसेच या संजय भंडारीचा जवळचा संबंध रॉबर्ट वड्रा यांच्यासोबत आहे. त्यामुळे वड्रा यांचीही संरक्षण साहित्याच्या डीलप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. यूपीएच्या काळात हा भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर आता काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, युरो फायटला डील मिळावं अशी राहुल गांधींची वैयक्तिक इच्छा होती. त्यामुळे संजय भंडारी आणि राहुल गांधी यांचेही व्यावसायिक संबंध असल्याचे समोर आले आहे. यावरून राहुल गांधी यांनी आपल्या कौटुंबिक फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे. त्यामुळे त्यांनी देशाला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही इराणी यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षातून एकामागोमाग एक नेते अन्य पक्षांत प्रवेश करीत असल्यामुळे आधीच चिंतीत असलेल्या राहुल गांधींना या प्रकरणामुळे जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपल्यावरील आरोपांना राहुल गांधी आता काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply