Breaking News

मटण दरवाढ; खाटीक जात नष्ट होण्याची भीती

मांसाहार करणार्‍यांच्या ताटात मटण असते आणि आपल्या भागातील मटण दराबाबत निर्माण झालेले संभ्रम लक्षात घेता मटण दरवाढ अपरिहार्य बनली आहे. राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि त्याचवेळी परराज्यातील विक्रेते यांच्याकडून बोकडांची चढ्या भावाने केली जाणारी खरेदी तसेच परदेशात थेट जिवंत बोकडांची होत असलेली निर्यात यामुळे मटणाचे दर  वाढण्याची शक्यता अपरिहार्य बनली आहे, पण हे अतिक्रमण आणि निर्यातीवर निर्बंध न आल्यास भविष्यात मटण विक्रेते म्हणजे खाटीक समाज ही बनलेली व्याख्या संपुष्टात येऊ शकते आणि कालांतराने खाटीक जातदेखील विस्मृतीत जाऊ शकते.

शेळी आणि मेंढीपालन हे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात व्यवसाय म्हणून केले जातात. त्या त्या भागातील हवामान आणि नैसर्गिक वातावरण हे या प्राण्यांच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण समजले जाते. याच भागातून शेळी आणि मेंढी यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यात तेथील खाद्य हेदेखील महत्त्वाची बाब आहे. मांसाहारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अन्न उपलब्ध आहे, पण बोकडाचे मटण हे मांसाहार करणारे यांच्यात मोठ्या प्रमाणात प्रिय असे खाद्य आहे. बोकडाचे मटण हे आपल्या राज्यात, देशात प्रिय आहे असे नाही तर प्रामुख्याने आखाती देशात बोकडाच्या मटणास मोठी मागणी आहे. त्याचवेळी आपल्या राज्यातील बोकडाचे मटण हे अन्य राज्यातील बोकडाच्या मटणाच्या तुलनेत चविष्ट असल्याचे दाखले मिळत असतात. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यातदेखील महाराष्ट्र राज्यातील बोकडांना मोठी मागणी आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिक राज्यात भरणार्‍या शेळी, मेंढी, बोकड यांच्या बाजारात जाऊन चढ्या भावाने त्यांची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.त्याला राज्यातील खाटीक समाजाचा विरोध असण्याचे कारण नाही, पण राज्यातील परिवहन विभागाच्या नियमांची अंमलबजावणी परराज्यातील वाहनांना बोकडांची वाहतूक करताना होत नाही. यामुळे महाराष्ट्र राज्यातील खाटीक व्यवसाय आणि त्या व्यवसायात असलेले अडचणीत आले आहेत.

मटण महाग होण्याची अनेक कारणे आहेत, पण मटण महाग विकले म्हणून राज्यातील अनेक भागात वादंग झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मटण महाग का झाले, याचा शोध घेतला असता मटण दरवाढीमध्ये अनेक कारणे पुढे येत आहेत. त्यात आपल्या जिल्ह्यात कुठेही शासनाच्या मान्यतेचा

कत्तलखाना नाही. त्यामुळे दररोज कापल्या जाणार्‍या बोकडांची आरोग्य तपासणी होत नाही, मात्र मुंबईतील देवनार येथे असलेला कत्तलखाना येथून आपल्या वाहनांपर्यंत मांस वाहून नेणे हे परवडत नसल्याने त्या

कत्तलखान्याचा उपयोग बाहेरच्या मटण विक्रेते यांना होत नाही, तर मुंबई आणि औरंगाबाद येथील कत्तलखान्यातून पूर्वी आखाती देशात बोकडाचे मटण शितपेटीमध्ये बंद करून पाठवले जायचे, मात्र गेल्या वर्षापासून प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद येथील विमानतळ येथून परदेशातील आखाती भागात जिवंत बोकड हे नेले जात आहेत. त्यामुळे बोकडाचे मटण विकून मिळणारे उत्पन्न शेळी आणि मेंढीपालन करणारे यांच्यासाठी फायद्याचे ठरत आहे, पण त्यामुळे चांगले बोकड हे थेट परदेशात जिवंत स्वरूपात जाऊ लागल्याने स्थानिक मटण विक्रेते यांना महागात आणि आपल्याला पसंत नसतील असे बोकडदेखील घ्यावे लागत आहे. त्यानंतर मटण दरवाढ करण्यास कारणीभूत असे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे बोकडांची परराज्यात होत असलेली वाहतूक. महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे व्यावसायिक यांना एकावेळी गाडीमधून जेमतेम 15 बोकडांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. तरीदेखील आरटीओचे अधिकारी आपल्याच राज्यातून आपल्याच राज्यात बोकड वाहतूक करणारे टेम्पो यांची तपासणी करतात, पण त्यावेळी नाशिक, पुणे येथे भरणार्‍या आठवडा बाजारात दक्षिणेकडील राज्यातील व्यावसायिक हे ट्रक घेऊन येतात आणि एकावेळी 200-300च्या संख्येने बोकड त्या ट्रकमध्ये भरून नेतात. त्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने बोकड घेऊन जाणार्‍या गाड्या या मॉडीफाय केलेल्या असतात. त्यावेळी त्या गाड्यांवर आणि गाड्यांमधून नेल्या जाणार्‍या बोकड यांच्या वाहतुकीवर हेच आरटीओ अधिकारी कारवाईचा बडगा उगारताना दिसत नाहीत. ही बाबदेखील महाराष्ट्र राज्यातील खाटीक समाजाला मटणाचे भाव वाढविण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

या दैनंदिन आणि नित्य बनलेल्या समस्या मटण दरवाढीबाबत अडचणी निर्माण करणार्‍या आहेत, पण त्याहून अधिक अडचण यावर्षी अवेळी आलेल्या पावसाने केली आहे. अवेळी आलेल्या पावसाने शेळी, मेंढी यांचा चारा प्रश्न निर्माण झाला असून अवेळी पावसामुळे प्राण्यांची वाढदेखील पुरेशी झाली नाही आणि त्यांचे वजन वाढले नाही, असे शेळी, मेंढी पालन सांगत आहेत. त्यामुळे त्यांना चढ्या भावाने आखाती देशात निर्यात करण्यासाठी कोणी मागणी केली तर आपल्या पदरी नफा मिळणार म्हणून ते कोणाची वाट पाहत नाही. अशा वेळी आपल्या राज्यातील खाटीक व्यवसाय करणारे हे विक्री भाव आणि आपला व्यवसाय यांचा ताळमेळ बसवून खरेदीसाठी जातात आणि त्यावेळी त्यांना बोकड खरेदी करण्यात अडचणी जाणवत आहेत. त्याचवेळी सुका चारा अवेळी पावसाने भिजून गेला असल्याने शेळी, मेंढी, बोकड यांना ओला चारा घालावा लागत आहे. ओल्या चार्‍याच्या खाण्याने प्राण्यांची वाढ योग्य होत नाही हे दिसून येत असल्याने सुक्या चार्‍याअभावी चांगले बोकड मिळेनासे झाले आहेत.

त्याचवेळी मटण विक्रेते यांना कोणतीही बँक त्यांचा व्यवसाय बैठ्या स्वरूपात नसल्याने कर्ज पुरवठा करीत नाही. त्यांचा व्यवसाय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता नसते. पाण्याची सोय अल्प प्रमाणात केलेली असते. या सर्व अडचणींमुळे खाटीक व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण होऊन बसले असल्याने जनतेला आणि खवय्यांना उद्या चढ्या भावाने मटण खरेदी करावे लागणार हे जवळपास नक्की झाले आहे. त्यावेळी व्यवसाय करणारे यांना संरक्षण देखील शासन देत नसल्याने आता शासनाने रेशन दुकानावर मटण विक्री सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र खाटीक संघ करीत आहे.त्यावेळी या व्यवसायावर झालेले अतिक्रमण हे रोखले गेल्यास परराज्यातील व्यावसायिक यांचा वावर थांबविण्याची गरज आहे. त्याचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा बोकड बाजार या ठिकाणीदेखील परराज्यातून

खरेदीसाठी येणारे व्यावसायिक यांना रोख लावण्याची गरज आहे. त्यामुळे आता खाटीक समाजाचा परंपरागत व्यवसाय टिकविण्यासाठी बाहेरील अतिक्रमण थांबविणे गरजेची बाब बनली आहे. त्याचवेळी या व्यवसायात आलेल्या अन्य लोकांकडून आता खाटीक समाजाला आपली जात नाहीशी होण्याची भीती निर्माण झाली आहे. – संतोष पेरणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply