इराण आणि अमेरिका यांच्यातील धुमश्चक्रीमध्ये तिसर्या महायुद्धाची बीजे काही युद्धतज्ज्ञांना दिसू लागली आहेत. त्यात तथ्य देखील आहे. कारण या युद्धाने उग्र स्वरुप धारण केल्यास अन्य देश त्यात आपोआप ओढले जातील व सारे जग त्या आगीत होरपळेल अशी चिंता जगातील नेते मंडळींना वाटू लागली आहे. अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये सुरू झालेली युद्धसदृश धमासान सर्व जगाचे प्राण कंठाशी आणणारी आहे यात शंका नाही. गेली अनेक वर्षे या दोन देशांमध्ये विविध राजनैतिक कारणांमुळे तेढ वाढतच चालली होती. त्याच्या पाठीमागे बराच मोठा इतिहास आहे. तथापि, त्या सर्व इतिहासाचा अर्थ काढला तर त्यातून हाती लागतो तो फक्त तेलाचा हव्यास. इराण हा क्रूड ऑइलचा जगातील महत्त्वाचा व मोठा पुरवठादार देश आहे. भारताला देखील तेलाचा सर्वाधिक पुरवठा इराणकडूनच होतो. हेच काळे सोने इराणला समृद्ध देशांच्या रांगेत नेऊन बसवणारे ठरले. अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असली तरी इंधनाचा हव्यास कोणालाही चुकलेला नाही. इराण किंवा शेजारचा इराक यांसारख्या आखाती देशांमध्ये बर्याच प्रमाणात व प्रदीर्घ काळ लुडबुडी करून अमेरिकेने अनेक वर्षे तेलाच्या व्यापारावर वर्चस्व गाजवले. परंतु आता परिस्थिती बदलली असून अमेरिका देखील पूर्वीइतकी प्रबळ महासत्ता उरलेली नाही. अमेरिकेच्या आखाती देशांमधील कुचाळक्यांना इराणने वेळोवेळी चोख उत्तर दिले. इराणच्या तिखट प्रतिकाराचे शिल्पकार होते ते त्यांचे लष्करप्रमुख कमांडर कासिम सुलेमानी. अमेरिकन लष्कराने आठवडाभरापूर्वी ड्रोनद्वारे हल्ला करून कमांडर सुलेमानी यांचा खात्मा केला. हा इराणच्या थेट गंडस्थळावरील हल्ला मानला जातो. कमांडर सुलेमानी यांनी अमेरिकेविरुद्ध युद्धाचे रणशिंग फुुुुंकले होते व अमेरिकेच्या किमान चार दुतावासांवर बॉम्बहल्ला करण्याचा कट रचला होता असा आरोप अमेरिकेने केला. कमांडर सुलेमानीसारख्या अमेरिकेच्या शत्रूचा अंत करणे नितांत गरजेचे होते असे नंतर व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे चवताळलेल्या इराणने लगोलग 12 क्षेपणास्त्रे सोडून इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर तुफानी हल्ला केला. इराणच्या या प्रत्युत्तरामध्ये अमेरिकेचे 80 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणच्या लष्कराने केला असला तरी अमेरिकेने मात्र याला दुजोरा दिलेला नाही. या धुमश्चक्रीमध्ये इराणी क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलेले युक्रेनचे प्रवासी विमान हवेतच उद्ध्वस्त झाले. सुरुवातीला युक्रेनच्या विमानाला अपघात झाला अशी आवई इराणने उठवली खरी, परंतु आपल्या चुकीमुळेच हा भयानक प्रकार घडल्याची कबुली त्यांना नंतर द्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत देश अमेरिका-इराणच्या समस्येत मध्यस्थाची चांगली भूमिका वठवू शकतो, असा सूर जागतिक नेतेमंडळींमध्ये उमटू लागला असून मोदीजींनी मध्यस्थी केल्यास त्याचे स्वागतच आहे असे इराणने देखील स्पष्ट केले आहे. मोदीजींनी गेली सहा वर्षे प्रयत्नपूर्वक इराणशी संबंध उत्तम ठेवले असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली त्यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. इराण आणि अमेरिका यांनी टोकाची भूमिका घेऊ नये म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतल्यास त्याचे उभयपक्षी स्वागत होईल यात शंका नाही. तसे घडले तर तिसर्या महायुद्धापासून अवघ्या जगाला वाचवण्याचे पुण्य भारताच्या खाती जमा होईल.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …