Breaking News

महाराष्ट्र सर्व बाद 434 धावा

रणजी सामन्यात झारखंडला प्रारंभिक धक्के

नागोठणे : प्रतिनिधी
रणजी क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने रविवारी (दि. 12) दुसर्‍या दिवशी खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना सर्वबाद 434 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या
षटकातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटके देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला तेव्हा झारखंडची 2 बाद 2 अशी बिकट परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्राचे अझीम काझी आणि विशांत मोरे या दोन फलंदाजांनी केलेली शतके ही दिवसाचे वैशिष्ट्य ठरली, तर झारखंडकडून उत्कर्ष सिंगने पाच बळी घेतले.
रिलायन्स कंपनीच्या नागोठणे येथील मैदानावर चालू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध झारखंड रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राची 5 बाद 88 अशी अवस्था झाली असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी चिवट फलंदाजी करीत शतके केली. त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राला 434 धावांपर्यंत मजल मारता आली. काझीने 544 मिनिटे खेळपट्टीवर राहून 140, तर मोरेने 328 मिनिटे खेळून 120 धावा केल्या. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपायला 19 मिनिटे शिल्लक असताना अक्षय पालकर 18 धावांवर राहुल शुक्लाच्या
गोलंदाजीवर सुमित कुमार याच्या हातात झेल देऊन बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव 434 धावांवर संपुष्टात आला.
झारखंडचा डाव सुरू झाल्यावर पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर कुमार देवव्रत माघारी परतला. त्याच्या जागेवर आलेल्या उत्कर्ष सिंगने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या, मात्र शेवटच्या चेंडूवर तोसुद्धा यष्टिरक्षक विशांत मोरे याच्या हाती झेल देऊन बाद झाला. या एका षटकानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केल्याने झारखंडाची अवस्था 2 बाद 2 अशी झाली आहे.
धावफलक
महाराष्ट्र (फलंदाजी) : 5 बाद 227 वरून पुढे, अझीम काझी झे. गो. उत्कर्ष सिंग 140, विशांत मोरे त्रि. गो. उत्कर्ष सिंग 120, सत्यजीत बच्छाव त्रि. गो. उत्कर्ष सिंग 18, अक्षय पालकर झे. सुमित कुमार गो. राहुल शुक्ला 18, मनोज
इंगळे झे. सौरभ तिवारी गो. अनुकूल रॉय 29, मुकेश चौधरी नाबाद 16, 172.3 षटकांत सर्वबाद 434 धावा; झारखंड (गोलंदाजी) : अजय यादव 28-11-54-1, राहुल शुक्ला 28.3-07-63-3, वरुण एरॉन 29-07-60-0, अनुकूल रॉय 33-05-113-1, उत्कर्ष सिंग 53-14-130-05, सौरभ तिवारी 01-0-03-0, अवांतर : 11, बळी बाद होण्याचा क्रम: 1-04, 2-05, 3-45, 4-66, 5-88, 6-264, 7-353, 8-372, 9-407, 10-434; झारखंड : कुमार देवव्रत झे. नौशाद शेख गो. मुकेश चौधरी 0, नाझीम खेळत आहे 0,उत्कर्ष सिंग झे. विशांत मोरे गो. मुकेश चौधरी 2, महाराष्ट्र गोलंदाजी : मुकेश चौधरी-01-00-2-2.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply