मँचेस्टर : वृत्तसंस्था
कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध 200 धावांचा टप्पा ओलांडला. 46.1 षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला, मात्र त्याआधी झालेल्या खेळामध्ये भारतीय गोलंदाजांनी आपली बाजू वरचढ ठेवली.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रवींद्र जडेजाने निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावले, मात्र चहलच्या गोलंदाजीवर जडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने 67 धावांची खेळी केली.
विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले, पण टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. पावसामुळे खेळ थांबवला गेला, तेव्हा टेलर नाबाद 67 धावांवर खेळत होता.