मोहोपाडा-प्रतिनिधी
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असतानाच वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या परिसराचे केंद्रबिंदू व सुसज्ज बाजारपेठ असणार्या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिक नेहमी बाजारहाट करण्यासाठी येत असतात. या वेळी बाजारहाट करताना आपल्या जवळील वाहन इतस्ततः लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असतात. दरम्यान, मोहोपाडा येथील वाहतुककोंडीची समस्या कित्येक वर्षे ’जैस थेच’ आहे. रोज सायंकाळी दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा माणिक प्रबल ते मराविम कार्यालय या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना एक दिव्यच झाले आहे. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा चार्ज सुजाता तानवडे यांच्याकडे जाताच त्यांनी मोहोपाडा वाहतूक कोंडी सोडविण्याकडे लक्ष घातले. त्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला, मुख्य रस्त्यावरील अनधिकृत रिक्षा थांबे हटविण्यासाठी वाहतूक शाखेशी पत्रव्यवहार केला. तसेच आपल्या पोलीस वाहनामार्फत वाहतुक समस्या सोडविण्यासाठी जनजागृती केली. वाहतुकीचे नियम न पालणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतात संबंधितांचे धाबे दणाणले. मोहोपाडा परिसरात पि-1, पि-2 या सम-विषम तारखनूसार रस्त्यालगत वाहने लागल्याने येथील वाहतुक कोंडीला पायबंद बसला आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मोहोपाडा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या कार्यांचा गौरव म्हणून रिस रसायनी येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचा सन्मान करुन त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. या वेळी अॅड. डि. टी. दांडगे, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक तानवडे यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. या वेळी माजी सरपंच कृष्णा पारंगे, मनसेचे उपजिल्हाप्रमुख दीपक कांबली, मामा कांबळे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मोहोपाडा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.