Breaking News

नागोठण्यातील पूर ओसरला

28 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत

नागोठणे : प्रतिनिधी

शहराच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर भरलेले पुराचे पाणी तब्बल 30 तासाने म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता पूर्णपणे ओसरून जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र शनिवारी सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी वाढत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर सकाळी 8 वाजता येथील विद्युत वितरण कंपनीकडून शहराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

शनिवारी सायंकाळी पुराचे पाणी काही अंशी ओसरत असल्याचे दिसून आल्याने शहराच्या काही भागात विद्युत पुरवठा चालू केला असता, काही वेळातच वादळी वार्‍यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने झाडांच्या फांद्या तुटून तारांवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. वीज वितरणच्या कर्मचार्‍यांनी रात्रीच या फांद्या काढून टाकल्या होत्या, मात्र एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस तारांवर पडलेले झाड, त्या भागात पुराचे पाणी असल्याने कर्मचारी तेथे जाऊ शकत नसल्यामुळे रविवारी सकाळी 10 वाजता पाणी ओसरल्यावर कर्मचार्‍यांनी तेथे जाऊन दुरुस्ती केली व वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. पुराचे पाणी सायंकाळी ओसरल्यावर दुकानदारांनी दुकानांची साफसफाई केली होती, मात्र रात्रीपासून पुन्हा पूर भरल्याने सकाळी पाणी ओसरल्यावर पुन्हा साफसफाई करण्याची आफत दुकानदारांवर ओढवली होती. पुरामुळे नागोठणे एसटी बस थांबा मुंबई-गोवा महामार्गावर हलविण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने प्रवाशांना महामार्गावर जाण्यासाठी मोठा वळसा घालून महामार्गावर जावे लागत होते. रविवारी भरणार्‍या आठवडा बाजाराच्या जागेत पुरामुळे चिखलसदृश जमीन झाल्याने या बाजारातील विक्रेत्यांनी शिवाजी चौकातच दुकाने थाटल्याने रविवारी वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडली होती. वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply