Breaking News

‘सीएए’वरून तरुणांची दिशाभूल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

कोलकाता : वृत्तसंस्था
नागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला असून, तो नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 12) येथे केले. जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितले त्याचेच पालन आम्ही करीत आहोत, असेही पंतप्रधान मोदी युवकांना संबोधित करताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकातातील बेलूर मठाला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. या वेळी त्यांनी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशातील तरुणाईच्या मनात अनेक प्रश्न आहेत. काही जणांनी मुद्दाम तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या आहेत, मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरुणांना समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. देशातील तरुणांकडून भारतालाच नाही, तर जगालाही मोठ्या अपेक्षा आहेत. पाकिस्तानमध्ये इतर धर्मातील लोकांवर अत्याचार होतो त्यावरही आपले तरुण आवाज उठवत आहेत. काही लोकांना जाणूनबुजून समजून घ्यायचे नसते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
फाळणीमुळे पाकिस्तानमध्ये राहिलेल्या ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे, असे राष्ट्रपिता असे महात्मा गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे मत होते. ती पूर्तता या कायद्याद्वारे करण्यात आली आहे. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती ज्यांचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे, ते प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवू शकते, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. सुधारित नागरिकत्व कायदा खूप विचारविनिमय केल्यानंतर आणण्यात आला आहे, मात्र काही लोकांना हे माहीत असूनही केवळ विरोध करायचा म्हणून ते विरोध करीत आहेत, असे मोदी  म्हणाले, तसेच उत्तर पूर्वेतील राज्य आमचा गर्व आहे. तिथली संस्कृती, प्रथा-परंपरा, लोकसंख्या यावर या कायद्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोलकाता पोर्टला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी या वेळी येणे टाळले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply