Breaking News

चार दिवस सुट्ट्यांमुळे मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दी

मुरूड : प्रतिनिधी

सलग चार दिवस सुट्टी पडल्याने पर्यटकांनी मुरूड येथे येणे पसंत केले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, बोरिवली व विरार आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक मुरूडला आले आहेत. त्यामुळे काशीद व मुरूड येथील पर्यटन व्यसायावर अवलंबून असणारे दुकानदार, हॉटेल मालक, लॉजिंग, स्टॉलधारक, घोडेवाले, टी-सेंटर, शहाळी विक्रेते यांना चांगलाच व्यवसाय उपलब्ध झाला आहे.

सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरसुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. राजपुरी नवीन जेट्टी त्याचप्रमाणे खोरा बंदर येथे वाहनांची मोठी गर्दी होती. राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदर येथून पर्यटकांना शिडाच्या व मशीन बोटीद्वारे जंजिरा किल्ल्यावर नेले जाते.

या भागात आज मोठी गर्दी आढळून आली. खोरा बंदर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची तोबा गर्दी होती. राजपुरी नवीन जेट्टी येथेसुद्धा गर्दी दिसून आली.

पर्यटकांची संख्या वाढल्याने शिडाच्या बोटींच्या कामगारांची धावपळ उडाली तरीसुद्धा ते पर्यटकांना सुविधा प्रदान करीत  होते. मुरूड तालुक्यातील काशीद हा सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. येथेसुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची गर्दी असून हजारोच्या संख्येने पर्यटक मौजमजा करताना आढळून आले. पर्यटकांच्या आगमनामुळे समुद्र किनारे फुलून गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply