योग्य वागणूक दिली नाही -अभिनेत्री भाग्यश्री मोटे

चंद्रपूर : प्रतिनिधी
शिवसेना पदाधिकार्याकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी राजुरा विधानसभा संपर्क प्रमुखाने माफी मागावी, अशी मागणी भाग्यश्रीने केली आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी योग्य सुविधा दिल्या नसल्याचा आरोप भाग्यश्रीने केला आहे. मी सकाळी आठ वाजता एअरपोर्टवर आले. मात्र, नऊ वाजेपर्यंत एअरपोर्टवर कोणी घ्यायला आले नाही. ज्यावेळी त्यांची माणसे न्यायला आली, त्यावेळी आम्ही आमच्या तयारीसाठी वेळ हवा असल्याचे सांगितले. मात्र, कार्यक्रमाला उशीर होईल, असे सांगत नागपुरात फ्रेश व्हायला वेळ दिला नाही. तुमच्यासाठी चंद्रपुरात हॉटेल बुक केले आहे. तिथेच तुमची रेडी होण्याची व्यवस्था केली असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही ज्यावेळी चंद्रपुरात पोहोचलो तेव्हा हॉटेल बुक नसल्याचे समजले. त्यानंतर दुसर्या एका साध्या हॉटेला आमची व्यवस्था करण्यात आली. चंद्रपुरात पोहचल्यानंतर तुमची तयारी तुम्हीच करा, आमच्याकडून कुठलीही सुविधा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. तीन दिवसांपासून रिटर्न तिकिट्स बद्दल विचारलं तरी चंद्रपुरात पोहचून देखील हातात रिटर्न तिकिट्स मिळाली नाही. अडीच तास गडचांदूरच्या कार्यक्रमासाठी दिला तरीही त्यांनी 10 पर्यंत थांबण्यास फोर्स केला. पण आम्ही न जुमानता निघालो. पण आमच्या परत जाण्याबद्दल काहीच सोय केली नाही. फोन पण स्वीच ऑफ केला. खूप वादविवाद केल्यावर रिटर्न तिकीट मिळाले, अशी आपबीती भाग्यश्री मोटे हिने आपल्या व्हिडीओमधून सांगितली आहे.
‘शिवसेनेच्या पदाधिकार्याने माफी मागावी’
या सर्व प्रकाराला शिवसेनेचे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे कारणीभूत असल्याचा आरोप अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. या प्रकरणी त्यांनी माफी मागण्याचे आवाहन भाग्यश्रीने व्हिडीओमधून केलं आहे.