पेण : प्रतिनिधी
पुरामुळे पेण तालुक्यातील मत्स्य शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे होऊनदेखील बाधीत शेतकर्यांना अद्याप नुकसान भरपाई किंवा मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई व अन्य मागण्यासांठी बाधीत शेतकर्यांनी सोमवार (दि. 13) पासून पेण प्रांत अधिकारी कार्यालयासमोर मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बेमूदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात समितीच्या जिल्हा संघटक मोहिनी गोरे, संतोष ठाकूर, राजन ठेमसे, संदिप पाटील, राजेंद्र म्हात्रे, आदिंसह तालुक्यातील मत्स्य शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तसेच भरतीच्या पाण्यामुळे पेण तालुक्यातील शेततलाव व मत्स्य शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधीत शेतकर्यांना त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, नुकसानग्रस्त शेतकर्यांना अल्प व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे, पुरामूळे झालेल्या शेततलावांच्या बांधांच्या दुरूस्तीची कामे व तलावात वाहून आलेला गाळ काढण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावीत, तालुक्यातील सर्व मत्स्य तलावांची फिशरीज डिपार्टमेंटकडे नोंदणी होऊन महसूल विभागामार्फत 7/12 ला तलावाच्या नोंदी करण्यात याव्यात, मत्स्य तलावासाठी विमा योजना लागू करावी आदि मागण्या उपोषणार्थीनीं केल्या आहेत. सदर मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार संघर्ष समितीने केला आहे.