Breaking News

चाय से किटली गरम

निवडणुकीत राबराब राबणार्‍या कार्यकर्त्यांनी एखादे वेळी स्तुतीसुमनांची उधळण करताना मर्यादा ओलांडली तर त्यावर कठोर कारवाई करणे नेत्यांना देखील अवघड होते. काही दिवसांपूर्वी कुण्या एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ग्रंथाबाबत असाच वाद उद्भवला. वास्तविक अशी पुस्तके आणि अन्य स्तुतीपर साहित्यसामग्री सदासर्वकाळ प्रसिद्ध होत असते. त्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम उपाय आहे.

पूर्वीच्या काळी जेव्हा भारत वर्षामध्ये संस्थानांचे राज्य होते, छोटे-मोठे संस्थानिक आपापली सैन्यदळे राखून असत. या सैनिक आणि शिलेदारांच्या निष्ठा राजाच्या चरणी वाहिलेल्या असत. किंबहुना, राजापेक्षा राजनिष्ठ अशा या सैन्यदळांच्या जोरावर संस्थानिकांचा कारभार चालत असे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातील ती संस्थाने खालसा झाली. त्या कामात सिंहाचा वाटा सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता. लोकशाहीच्या व्यवस्थेत संस्थाने आणि संस्थानिक खालसा झाली असली तरी त्यांची जागा काही पुढार्‍यांनी घेतली आणि राजापेक्षा राजनिष्ठ अशा सैनिकांची जागा राजकीय कार्यकर्त्यांनी उचलली. वास्तविक गेल्या 70 वर्षांमध्ये आपल्या देशाने जितके पुढारी पाहिले, अनुभवले, त्यापैकी फारच थोड्यांनी सरंजामी थाटाचा आग्रह कायम ठेवला. बहुसंख्य नेतेमंडळी ही स्वातंत्र्य चळवळीतूनच पुढे आलेली होती. किंबहुना, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करून मिळवलेली सत्ता ही लोकशाहीमुळे आपल्याला मिळालेली आहे याचे त्यांना भान होते. नेतेमंडळींनी लोकशाहीची मूल्ये कमीअधिक प्रमाणात पचवली असली तरी उत्साही कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजुनही कधीकधी जुने सरंजामी संस्कार दिसून येतात. त्यातूनच आपल्या नेत्याच्या चापलुसीची भावना अशा कार्यकर्त्यांमध्ये बळावत जाते. त्यांना मग आपला नेता ‘जाणता राजा’ वाटू लागतो किंवा आपली महिला नेता ‘राजमाता जिजाऊ बाईसाहेबां’सारखी वाटू लागते. काही कार्यकर्त्यांना आपला नेता चक्क ‘श्रीरामा’चा ईश्वरी अवतार वाटू लागतो किंवा त्याच्या ठायी कोणाला ‘स्वामी विवेकानंद’ दिसू लागतात. दक्षिणेमध्ये तर हे प्रकरण गंभीर वळण घेते. तिथे तर आपल्या नेत्यासाठी भर चौकात आत्मदहन करण्यापर्यंत मजल गेल्याची उदाहरणे आहेत. हे असे वर्तन त्या-त्या नेत्यांना अपेक्षित असतेच असे नाही. किंबहुना, अशा वर्तनाचा झालाच तर मनस्तापच अधिक होतो. परंतु, कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालण्याइतकी अवघड गोष्ट दुसरी नाही. कारण याच कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीतील यशापयश अवलंबून असते. याच कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर सत्तेचा लंबक हलत असतो. हाती कुठलेही विकासकाम उरलेले नसल्यामुळे विरोधीपक्षांनी मात्र या पुस्तकाचे भांडवल करून निष्कारण वाद उभा केला. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक जय भगवान गोयल नामक आता भाजपवासी असलेल्या एका माजी शिवसैनिकानेच लिहिलेले आहे. परंतु कुणीही न वाचलेल्या या पुस्तकावर महाराष्ट्रातील नवे सत्ताधारी अत्यंत उत्साहाने तुटून पडले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारात आपापल्या खात्यांचे काम मार्गी लावण्याचे सोडून एका नगण्य पुस्तकाखातर भारतीय जनता पक्षावरती तोंडसुख घेण्यात त्यांनी धन्यता मानली. त्याला अर्थातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले. खरे तर हा सारा वादच अतिशय हास्यास्पद आणि निष्कारण वेळ खाणारा आहे. ‘चहापेक्षा किटली गरम असते’ या न्यायाने चालणार्‍या आपल्या राजकीय पक्षांनी देखील या प्रवृत्तींचा योग्य वेळी बंदोबस्त करावा ही अपेक्षा.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply