Breaking News

जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

उरण : प्रतिनिधी
ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 92वा स्मृतिदिन रविवारी (दि. 25) झाला. यानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. त्या वेळी ब्रिटीश सरकारने अमानुषपणे सत्याग्रहींवर गोळीबार केला. यात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (दोघेही चिरनेर), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), रघुनाथ मोरेश्वर शिंदे (कोप्रोली), हसुराम बुधाजी घरत (खोपटे) व परशुराम रामा पाटील (पाणदिवे) यांना हौताम्य आले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जातो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी शूरवीर हुतात्म्यांना पोलिसांच्या वतीने बंदुकांच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ज्या हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा शाल, श्रीफळ देऊन या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply