भारताच्या नावे लाजिरवाणे रेकॉर्ड्स
मुंबई : प्रतिनिधी
डेव्हिड वॉर्नर व अरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डेत टीम इंडियाचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व आघाड्यांवर भारतावर वर्चस्व गाजवले. सामन्यात ऑस्ट्रेलियाने काही विक्रम केले, तर काही लाजिरवाणे विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तिसर्यांदा अशी घटना घडली आहे की 250 धावांचा पाठलाग करणार्या संघाने 10 विकेट्स राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यांत पराभूत होणारा संघ हा आशिया खंडातला आहे.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व अरॉन फिंचच्या जोडीने दुसर्यांदा भारताविरोधात द्विशतकी भागीदारी रचली. 2017मध्ये बंगळुरूमध्ये उभय संघांत खेळवण्यात आलेल्या सामन्यात वॉर्नर-फिंच जोडीने 231 धावांची सलामी दिली होती.
वॉर्नर-फिंच जोडीने केलेली भागीदारी आतापर्यंतच्या इतिहासातील भारताविरुद्ध केलेली सर्वांत मोठी भागीदारी ठरली.
भारतीय संघ चौथ्यांदा 10 विकेट्सनी पराभूत झाला, तर दुसर्यांदा भारताला होम ग्राऊंडवर 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.
भारतात खेळताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड मोडण्याची विराट कोहलीला संधी होती, परंतु त्यासाठी आता पुढच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे.
वानखेडेवर भारताने सर्वाधिक (09) एकदिवसीय सामने गमावलेत. त्यानंतर इडन गार्डन्सचा (08) नंबर लागतो.
चार दशकांपासून प्रत्येक दशकाची टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केली. 1990, 2000, 2010 साली व वर्षाच्या दशकाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. भारत वानखेडेवर दशकातला पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यातही भारताला पराभवाची चव चाखावी लागली. भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात सलग चार एकदिवसीय सामने गमावलेत.
विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षभरात (2019-2020) भारतीय संघ सात वेळा 250 धावांच्या आत ऑल आऊट झाला आहे.