Tuesday , February 7 2023

एसटी बसला ट्रकची धडक, वाकण-पाली मार्गावरील अपघातात 25 प्रवासी जखमी

नागोठणे : प्रतिनिधी

पेणहून पालीला जाणार्‍या एसटी बसला गुरूवारी (दि. 16)सकाळी वाकणनजीक समोरून येणार्‍या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर 22 प्रवासी जखमी झाले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा  समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेणहून पालीला जाणारी एसटी बस (एमएच-14,बीटी-156)  नागोठणे बसस्थानकातून गुरूवारी सकाळी आठ वाजता सुटली होती व सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वाकण नाक्यावर थांबून पुढे पालीकडे रवाना झाली असता, समोरून वेगाने आलेल्या आयशर ट्रकने एसटी बसला समोरून जोरदार धडक दिली व त्यात एसटी बसमधील प्रवासी समोरील सीटवर तसेच इतर ठिकाणी आदळून जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक, महिला बसवाहक आणि इतर प्रवासी जखमी झाले.  या बसमधून दररोज सकाळी पालीच्या जे. एन. पालीवाला महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जादा असते. त्यामुळे जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश लक्षणीय आहे. जखमींना तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉ. कोकणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचालक आणि तीन चार प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबागच्या शासकीय रुग्णालय तसेच नवी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह स्थानिक डॉ. सुनील पाटील, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. अभिषेक शहासने यांनी  जखमींवर उपचार केले.

अपघातानंतर काही वेळातच रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, किरणकुमार सूर्यवंशी, एसटीच्या रोहे आगाराचे प्रमुख विकास पोकळे यांनी जखमींची भेट घेऊन चौकशी केली. एसटी महामंडळाकडून जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.  जखमींना पुढील रुग्णालयात नेण्यासाठी रिलायन्स तसेच महाराष्ट्र सिमलेस या कंपन्यांच्या रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. जखमींची नावे : दत्ताराम मोरे (रा. शिलोशी), राणी माने (रा. बाहेरशीव), भाविका मढवी (रा. निडी ), गृहती डाकी (रा. शेतपळस), कीर्ती चोगले (रा. पांडापुर), प्रज्वल घासे (रा. शेतपळस), हेमा पिंगळा(रा. गंगावणे), नितेश सुतार(रा.मेढा ), प्रिया भोईर(रा. कोलेटी), पूजा म्हात्रे – बसवाहक (रा. कोप्रोली, पेण ), जय नावले (रा. बाळसई), त्रिवेणी पाटील (रा. मुंढाणी), प्रिया गदमले(रा. शिहू), रेश्मा खाडे (रा. तरशेत), स्नेहा पाटील (रा. शिहू ), मुरलीधर देशमुख, ट्रकचालक (रा. खोपोली ), शशिकांत चोगले (रा. पांडापूर), हर्षाली बडे (रा. कोलेटी), प्राजक्ता डाकी (रा. शेतपळस), अंजली दि. जाधव (रा. नागोठणे), किरण मांडेर (रा. महागाव), साहिल जंगम (रा. बाळसई), पोपट खेडकर, बसवाहक (रा. पेण) आणि ललिता जांभळे (रा. पळस), हर्षाली मलक.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply