Sunday , February 5 2023
Breaking News

आरोग्यम धनसंपदा

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जो तो यंत्रवत काम करीत आहे. कामाचा प्रचंड रेटा आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे धावपळ होणे स्वाभाविकच आहे, पण कळत-नकळत मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे.

आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या व्यस्त जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे. यासाठी आरोग्य जागृती महत्त्वाची आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस आहे. जगात उद्भवणार्‍या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी जागतिक पातळीवर जनजागरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट कमी होत चालले आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळतेे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे, पण त्यामुळे काही अंशी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ हरविले आहे. प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने कार्बन वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या निर्माण झाली आहे.

आरोग्य चांगले रहावे असे वाटत असेल तर हवा शुद्ध असली पाहिजे. हवा शुद्ध राखण्यासाठी आपल्या परिसरात स्वच्छता राखली पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. धूर, केरकचरा, गटारे यांच्यामुळे आरोग्य धोक्यात येते. ते लक्षात घेता परिसर हा स्वच्छ राखला पाहिजे. रस्त्यात कोठेही थुंकणे, नाक साफ करणे, धूम्रपान करणे इत्यादी सवयी टाळल्या पाहिजेत.

आपला आहार संतुलित असला पाहिजे. तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, खाण्यात डाळी,फळे, दूध, पालेभाज्या, सॅलड्स इत्यादींचा समावेश हवा. सात्त्विक आहार असेल तर आपले शरीर निरोगी राहते. दररोज काही ठराविक वेळेत व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. रक्ताभिसरण चांगले होते. शरीर बळकट झाल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. आपोआपच रोगजंतूंशी रक्तपेशी लढू शकतात. उत्साह वाढतो व कोणतेही काम आपण सहजपणे करू शकतो. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. ठरावीक वेळ काम केल्यानंतर पुरेशी विश्रांती आवश्यक असते. पुरेशी विश्रांती न मिळाल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. कोणतेही काम कुशलतेने व नीटनेटके करायचे असेल, तर पुरेशी विश्रांती घेतलीच पाहिजे.

आणखी एक मुख्य घटक म्हणजे पिण्याचे पाणी. हे पाणी शुद्ध असले पाहिजे. ते गाळून, उकळून निर्जंतूक करून घेतलेले असले पाहिजे, अन्यथा पाण्यावाटे काही रोगांचे जंतू पोटात प्रवेश करतात. त्यातूनच रोगांचा प्रादुर्भाव होतो. या सर्व आरोग्याबाबतच्या प्राथमिक गोष्टी झाल्या. या सर्व गोष्टींबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक संतुलन. एकमेकांशी बंधुभावाने वागले पाहिजे. म्हणजे मानसिक आरोग्य चांगले राहील.

एकंदर आरोग्याबाबत प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहिले पाहिजे. व्यक्तिगत स्वच्छतेबरोबर परिसराची स्वच्छता राखण्यासाठीही प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणजेच स्वत:साठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आरोग्य हे धन आहे आणि प्रत्येकाने शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply