माणगाव : प्रतिनिधी
ग्रामपंचायत कडापे व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या कांदळगाव बुद्रुक, कडापेवाडी, कडापे, येरद, येरद आदिवासी वाडी बांदलवाडी व जवळील ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी लाभ घेतला.
या वेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय. प्रभे, ग्रामपंचायत कडापे सरपंच व सर्व सदस्य, विस्तार अधिकारी गायकवाड, मिंडे, पशुधन पर्यवेक्षक मोकल, कदम व सहकारी, महसूल मंडळ अधिकारी व तलाठी, बँक ऑफ महाराष्ट्र उपव्यवस्थापक ठाकूर व सहकारी, प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी इंगोले व सर्व सहकारी, अंगणवाडी व आशासेविका उपस्थित होते.
बीडीओ यांनी शेवटच्या घटकाला सर्व कागदपत्रे व शासकीय लाभ मिळण्याकरिता तत्पर राहून आपले आर्थिक उत्पन्न वाढवून राहणीमान सुधारावे असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रोजगार हमी योजना व फळबाग लागवड, कुकुटपालन, शेळीपालन यासारख्या उत्पन्न स्त्रोत वाढवून गरिबी दूर करावी, असे आवाहन केले.
गायकवाड यांनी महापंचायत राज अभियान व उद्देश ग्रामस्थांना समजावून सांगितले. कागदपत्रे मिळण्याकरिता या शिबिरात संबंधिताकडून जॉबकार्ड, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री जनधन खाते, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, ई-श्रम कार्ड, पॅन कार्ड, असे एकूण 109 अर्ज भरून घेण्यात आले. या कार्यक्रमात कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमार्फत झेरॉक्स व प्रत्येकाचे पासपोर्ट फोटोदेखील गावातच शिबिराच्या ठिकाणी देण्याची सोय करण्यात आली होती.