नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सत्तेत असणार्यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही.
अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. यावर जोशी म्हणाले की, मंदिरासाठी उचलण्यात आलेल्या कोणत्याही पावलांचे आम्ही स्वागत करतो. मंदिर त्याच जागी होईल आणि त्यासाठी आम्ही कोणतीच तडजोड करणार नाही. मध्यस्थ जर त्या दिशेने गेले; तर आम्ही त्यांचे स्वागत करू. जेव्हा त्रिसदस्यीय समिती यावर कार्यवाही सुरू करेन त्या वेळी सर्व समजेल. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्याायलयाचे निवृत्त न्या. एफ एम कलीफुल्ला आहेत. इतर दोन सदस्यांमध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि जेष्ठ विधिज्ञ श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. योगायोगाने मध्यस्थी समितीतील तिघेही तामिळनाडूतून येतात. मंदिर निर्मितीपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगताना ते म्हणाले की, 1980-90पासून आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मंदिर पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. न्यायालयाने तत्परतेने यावर निर्णय घ्यावा.