

महाड : प्रतिनिधी
ऐन पावसाळ्यात महाड पंचायत समितीच्या नवीन इमारतीची वाट बिक़ट झाली आहे. पावसाचे पाणी साचून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने कर्मचारी व ग्रामस्थांना या कार्यालयात चिखल व गढूळ पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. महाडमध्ये 40 वर्षांपूर्वी बांधलेली पंचायत समिती कार्यालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याने तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण भागातील मूलभूत विकासाचे केंद्रबिंदू असल्याने गावातील शिक्षण, शेती, गावातील बांधकामे, आरोग्य, पशुधन विकास अशी विविध विकासकामे आणि दाखल्यांकरिता शेकडो ग्रामस्थ दररोज पंचायत समिती कार्यालयात येत असतात. महाड पंचायत समितीची नवी इमारत बांधताना समोरील जागेचे सुशोभीकरण करण्यात आलेले नाही तसेच जमीन सपाटीकरणही केले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात या इमारतीसमोर पाण्याचे डबके साचले आहे. परिणामी गढूळ पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून ते नव्या इमारतीपर्यंत ही अवस्था दिसून येते. याच आवारातील पाणीपुरवठा विभागात जाणे कठीण झाले आहे. पंचायत समिती प्रशासनाला मात्र याचे सोयरसुतकच नसल्याचे दिसून येत आहे.