अलिबाग, पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव नरवीर तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी आहे. या गावात तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्या समाधी आहेत. यंदा तान्हाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी 17 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्त नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरण केले जात आहे.
मोठ्या संख्येने पर्यटक या गावाला भेट देतात. नरवीर तान्हाजी मालुसरे कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारतीर्थी पडले. तान्हाजी मालुसरे यांचे पार्थिव कोंढाणा किल्ल्यावरून मडेघाटमार्गे उमरठ येथे आणण्यात आले. तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारी शेलारमामा यांचीही समाधी आहे. रायगड जिपने या समाधीचे नूतनीकरण केले होते. तेथे जिल्हा परिषदेने विश्रामगृह बांधले आहे.
यंदा नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे या समाधीचे नूतनीकरण तसेच परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. त्यासाठी शासनाच्या विविध विभागांतर्फे 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या समाधीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खास कर्नाटकातून दगड मागविण्यात आले आहेत. कोल्हापूरचे कारागीर समाधीच्या नूतनीकरणाचे काम करीत आहेत. समाधी परिसराला किल्ल्यासारखी तटबंदी करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास साकारण्यात येणार आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी 17 फेब्रुवारीला आहे. त्या वेळी ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमाचे दिग्दर्शक ओमी राऊत यांना नरवीर तान्हाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अजय देवगण, काजोल देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत.
-रामदास कळंबे, सदस्य, नरवीर तान्हाजी मालुसरे उत्सव समिती