Breaking News

सिमेंट बंधारा शेतकर्यांसाठी वरदान

कर्जत तालुक्यातील शेतकरी सुखावले; ओहोळाच्या पाणीसाठ्यात वाढ

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील आरडे गावाच्या मागील बाजूने डोंगरातून पाणी वाहून नेणार्‍या ओहोळाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केला, मात्र त्या नाल्यावर बांधलेला सिमेंट बंधारा स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अनेक कारणांनी हा सिमेंट बंधारा मदतीला आला आहे. कर्जत तालुक्यातील आरडे हे गाव कळंब-पाषाणे-वांगणी रस्त्यावर आहे. गावामागे मोठ्या प्रमाणात जंगल असून तो परिसर उंचसखल आहे. त्यामुळे त्या भागातून पावसाळ्यात एक मोठा ओहोळ वाहतो. त्याचे पाणी पावसाळ्यात तेथे असलेल्या उतारामुळे न थांबता वाहत जाते. त्यामुळे पावसाळा संपला की काही दिवसांतच ओहोळात पाण्याचा खडखडाट असतो. त्यामुळे उन्हाळ्यात ओहोळाचे पात्र सतत रुक्ष असायचे. त्यामुळे त्या ओहोळावर सिमेंट बंधारा बांधावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे 2016मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ओहोळावर पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला. 2017मध्ये प्रथम त्या साठवण बंधार्‍यात पाणी साठले गेले होते, मात्र बंधार्‍यातील पाणी किती दिवस साचून राहणार याची खात्री नसल्याने शेतकर्‍यांनी शेती केली नव्हती, परंतु सिमेंट बंधार्‍याचे काम मजबूत झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून एप्रिलपर्यंत बंधार्‍यामुळे पाणी दिसून येते. बंधार्‍यातील साठवण क्षमताही चांगली असल्याने त्याचा फायदा स्थानिक शेतकरी उचलू लागले आहेत. पाणी साठवण बंधार्‍यामुळे आरडे गावाच्या परिसरातील जमिनीची भूजल पातळी वाढली. त्या ठिकाणी शेतकरी भाजीपाला आणि अन्य प्रकारचे व्यवसाय त्या पाण्यामुळे करू लागले आहेत. सिमेंट बंधार्‍यामुळे आता तेथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा दिसतो. पाण्यामुळे ओहोळातील सिमेंट बंधार्‍याखालील भागही पाणीदार झालेला दिसून येतो. या पाण्यामुळे आरडे भागातील शेतकरी खूश असून बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग सर्व शेतकरी आणि लहान उद्योजक करताना दिसत आहेत.

सिमेंट बंधारा झाल्याने आमचा भाग जो उन्हाळ्यात कोरडा असायचा तो आता पाणीमय दिसून येत आहे. या पाण्याचा उपयोग आमचे शेतकरी करीत असून, आमच्यासाठी हा बंधारा फायद्याचा ठरला आहे.

-उत्तम शेळके, ज्येष्ठ ग्रामस्थ, आरडे

आमच्या विभागाकडून बहुतेक ठिकाणी बांधलेल्या सिमेंट बंधार्‍यांचे बांधकाम चांगले झाले. त्यामुळे बंधार्‍यात चांगल्या प्रकारे पाणीसाठा होत असून त्याचा फायदा शेतकरी घेताहेत. सिमेंट बंधारे बांधण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न शेतकरीवर्गासाठी व जमिनीची भूजल क्षमता वाढविण्यास मदतीचा ठरत आहे.

-आर. डी. कांबळे, उपअभियंता, जिल्हा परिषद

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply