Breaking News

रिक्षाचालकांनीच केली रिक्षाचालकाला मारहाण

पनवेल : बातमीदार

परिवहन विभागाने मिळेल त्याला रिक्षाचा परवाना दिल्यामुळे ग्राहकांशी कसे वागावे याची माहिती नसलेल्यांना रिक्षा व्यवसायामध्ये उतरवून परिवहन विभागाने नेमके काय साध्य केले? हा प्रश्न जनतेसमोर असतानाच रिक्षा थांबे म्हणजे आपली जहागिरी असल्यासारखे वागणार्‍यांवर कारवाई तरी कधी होणार? बुधवारी सायंकाळी 4च्या दरम्यान पनवेल येथील ओरियन मॉलजवळ ग्राहकांनी रिक्षा थांब्यावरील रिक्षा अधिक भाडे आकारणी करीत असल्यामुळे ओला सर्व्हिस वापरण्याचा निर्णय घेऊन रिक्षा बुकिंग केली, या वेळी ग्राहकाला घेण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकाला येथील रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकासह अन्य दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या वेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील ओरियन मॉल जवळ असलेल्या रिक्षा थांब्यावर कामोठे सेक्टर 21 येथे जाण्यासाठी गिर्‍हाईक आले होते, मात्र या ठिकाणी 120 रुपये भाडे सांगण्यात आले आणि तेच भाडे मीटरप्रमाणे ओला कंपनीच्या अ‍ॅपमध्ये 50 ते 55 रुपये इतके होत असते. त्यामुळे ग्राहकाने ओला कंपनीची सर्व्हिस देणारी रिक्षा ऑनलाइन बुक केली. या वेळी ग्राहकाला घेण्यासाठी रिक्षाचालक शिवाजी आमटे आपल्या ताब्यातील रिक्षा क्र. (एमएच 46, एझेड 0971) ही घेऊन ग्राहकांना बसण्यास सांगितले असता, या ठिकाणी स्थानिक रिक्षाचालकांनी या रिक्षाचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या वेळी भारत मढवी व अन्य दोघांनी रिक्षाचालक शिवाजी आमटे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाजी आमटे याला मुका मार लागला असून याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम 323, 504, 506 कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply