मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.
मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 24 तास सुरू ठेवण्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले होते. मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू होणार असल्याची चर्चा होती, पण यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (दि. 19) प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला वाटत नाही मुंबईत नाइट लाइफ येत्या 26 जानेवारीपासून सुरू होईल. कारण हा विषय पहिल्यांदा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येईल. येत्या 22 जानेवारीला यावर चर्चा होईल. त्यानंतरच निर्णय होईल. मुळात नाइट लाइफमुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार हे निश्चित. याबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. नाइट लाइफची मागणी ठीक आहे, पण हे होत असताना यंत्रणा नीट आहे का याचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल. देशमुख यांच्या भूमिकेमुळे आदित्य यांना अतिघाई नडल्याची चर्चा आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …