कंटेनर मालवाहतुकीची टक्केवारी घटण्याचा अंदाज
उरण : प्रतिनिधी
आखातात इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीत पातळीवर होणार असून, भारतालाही त्याची झळ बसण्याची चिन्हे आहेत. जेएनपीटीतील कंटेनर वाहतुकीची टक्केवारीही घटेल. या वर्षात बंदरातील मालाच्या जलवाहतूक आयात-निर्यात व्यापारात फक्त तीन-चार टक्के इतकीच वाढ होईल, असा अंदाज जेएनपीटी अधिकार्यांच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना व्यक्त करण्यात आला. जेएनपीटी बंदराच्या वार्षिक व्यवसाय, विकसित प्रकल्प, विविध कार्यान्वित करण्यात आलेल्या योजना आणि भविष्यात विकासाच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रशासन भवनाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस डेप्युटी कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर, बंदर प्रशासनाचे सचिव तथा मुख्य प्रबंधक जयंत ढवळे, प्रबंधक एन. के. कुलकर्णी, एस. व्ही. मदभावी, मार्केटिंग असिस्टंट मॅनेजर अंबिका सिंग, वित्त विभागाचे व्यवस्थापक संजीव कुमार, एस. एम. शेट्टी आदी उपस्थित होते. या वेळी माहिती देताना अधिकार्यांनी सांगितले की, डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरणात 80 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. उरण परिसरातील सुरू असलेल्या तीन हजार कोटी खर्चाचे सात उड्डाणपूल, कॉरिडॉर आणि सहा-आठ पदरी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले नाही. 277 हेक्टर क्षेत्रावर सुरू असलेले जेएनपीटी सेझचे कामही संथपणे सुरू आहे. या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचे जेएनपीटी बंदर दिवसेंदिवस तोट्यात चालले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लांबलेला पावसाळा आणि उड्डाणपुलाच्या स्पॅन चेसिजमधील कामातील झालेले काही तांत्रिक बदल आदी कारणांमुळे कामांना विलंब होत आहे. या विलंबामुळेही जेएनपीटीच्या आयात-निर्यात व्यापारावर परिणाम होत आहे, परंतु एनएचआय (नॅशनल हायवे ऑथेरिटी) यांच्याकडे सोपविण्यात आलेले तीन हजार कोटींचे उड्डाणपूल, कॉरिडॉर आणि सहा-आठ पदरी रस्त्यांची कामे येत्या एप्रिल ते डिसेंबर 2020दरम्यान पूर्ण होतील, असा विश्वासही अधिकार्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. वर्धा आणि जालना ड्राय पोर्टसाठी बेसिक पायाभूत सुविधा जेएनपीटीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे छोटेमोठे व्यापारी आणि शेतकर्यांना शेतीमाल कमी खर्चात थेट जेएनपीटी बंदरातून निर्यात करणे सहज शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदराच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बंदरात 15.06 मीटर खोलीपर्यंत मालवाहू जहाजे येऊ लागली आहेत. पालघर, डहाणू येथील 10 हजार कोटींच्या वाढवण बंदराचे कामही नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय व्यापार आणि व्यवसायाच्या वृद्धीसाठी विकासाच्या अनेक योजना अमलात आणल्या जाणार असल्याचेही अधिकार्यांनी या वेळी सांगितले.