Breaking News

रस्त्यासाठी कोरळवाडी आदिवासींचा तहसील कार्यालयासमोर मोर्चा

पनवेल : वार्ताहर

तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरळवाडी आदिवासीवाडीला आजही रस्ता, पाणी व शिक्षणाची व्यवस्था नाही, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांसह आजारपणात जीवही गमवावा लागतो. त्यामुळे जोडरस्त्यासह इतर मागण्यांसाठी कोरळवाडीतील आदिवासी बंधू-भगिनींनी आपल्या मुलाबाळांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 20) पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पनवेल शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून निघालेला हा मोर्चा लाइन आळी, जय भारत नाका, महापालिका कार्यालयामार्गे पनवेल तहसील कार्यालयाजवळ जात असताना पोलिसांनी तो अडविल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी आदिवासी महिलांनी त्यांच्या व्यथांचे पाढे अधिकार्‍यांसमोर मांडून साहेब, तुम्ही आमच्या वाडीत एकदा या म्हणजे कळेल आम्ही कसे जगतो ते, असे भावनिक आवाहन केले. ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. प्रमोद ठाकूर यांनी मोर्चाला पाठिंबा देत कोरळवाडीच्या बाजूने न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले, तर स्थानिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अमोल शितोळे, मंगेश आढाव, राष्ट्र सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष संतोष ढोरे यांनीही आदिवासींच्या लढ्याला यश येईपर्यंत साथ देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पोलिसांनी मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाला तहसील कार्यालयात नेले. तेथे नायब तहसीलदार आदमाने व मोर्चेकरी यांच्यात चर्चा झाली. या वेळी आदमाने यांनी येत्या चार दिवसांत संबंधित सर्व अधिकार्‍यांना घेऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहण्यासाठी कोरळवाडीत येण्याचे आश्वासन दिले. यावर येत्या 15 दिवसांत निर्णय न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा आदिवासींनी दिला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply