म्हसळा : प्रतिनिधी
महिलांनी सर्व क्षेत्रांत स्वतःला सिद्ध केलं आहे. गाव विकास प्रक्रियेतही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त पोषण आहार सप्ताह कार्यक्रमात मत व्यक्त करताना केले. महिलांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध विषयांच्या कार्यशाळा घेतल्याने तसेच शासनाचे महिलांविषयी सकारात्मक धोरण यामुळे
सक्षमीकरण गतिमान होऊ शकले. या वेळी शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी लिंग समानतेबाबत बोलताना सांगितले की, स्त्रियांनी समाजाच्या सहनुभूतीवर न जगता सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध करावे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांत स्त्रियांना विशेष प्राधान्य आहे. अनेक तरुणींनी देशाच्या प्रशासन व्यवस्थेत आपला ठसा उमटवला आहे. डॉ. प्रणाली पाटील यांनी मासिक पाळीत घ्यायची काळजी व राखावयाची स्वछता याविषयी, तर समुपदेशक मनीषा गायकवाड यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा व त्यातील कलमे यांचा वापर याविषयी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची रूपरेषा व मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उमा मुंडे यांचे होते.
या वेळी पोषण आहार पखवाडा (पंधरवडा) या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण नितीन मंडलिक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शीतल पुंड यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी, तर सूत्रसंचालन आनंद धिवर यांनी केले. आभार प्रदर्शन मेघा म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाला महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.