भाजपच्या वतीने महाडमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप
महाड : प्रतिनिधी : महाड-पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या मदतीसाठी भाजपा पुढे सरसावली आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड पोलादपूरमध्ये 5 हजार लिटर क्षमतेच्या जवळपास 50 टाक्या वाटण्याचा संकल्प केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते काही गावांना या टाक्यांचे वाटप करण्यात आले.
महाड तालुक्यात 13 गावे आणि 20 वाड्यावर भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास तालुक्यात पाणीटंचाई गावांची संख्या वाढणार आहे. या पाणीटंचाई काळात प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तोही अपुरा पडत आहे. तसेच बहुतांशी गावांमधून टँकरद्वारे आणलेले पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने अशा गाव वाड्या वस्त्यांमधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळासोबत दोन हात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाड पोलादपूरमधील अशा टंचाईग्रस्त गावांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपा पक्ष सरसावला आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड पोलादपूरमध्ये 5 हजार लिटर क्षमतेच्या जवळपास 50 टाक्यावाटपाचा संकल्प हाती घेतला आहे.
तहसिलदार यांनी या टंचाई गावांची निवड केली असून वलंग येथील आदिवासी वाडी, कुर्ले बौद्धवाडी, दासगाव गणेशवाडी, रायगडवाडी गावातील खडकवाडी आणि ताम्हाणे या गावातून या टाक्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार प्रवीण दरेकर, आ. भरतशेठ गोगावले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, महेश शिंदे, संदीप ठोंबरे, वलंगचे सरपंच भारत विचारे, दासगावचे सरपंच दिलीप उकिर्डे, अरुण कासारे, बाळाराम कासारे, भिमराव कासारे, जालिंदर मोरे, ताम्हाणे सरपंच सुनील बोरेकर, रायगडवाडी ग्रामपंचायत सदस्य गणेश औकिरकर, तहसिलदार चंद्रसेन पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.