पनवेल : वार्ताहर
रिक्षात विसरलेली बॅग जशीच्या तशी प्रवाशाला परत करणार्या प्रामाणिक रिक्षाचालकाचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण व सहकार्यांनी कौतुक करून त्याचा विशेष सत्कार केला आहे.
न्यू पनवेल ते ओरियन मॉल पनवेल या प्रवासादरम्यान प्रवासी महिलेची रिक्षात विसरलेली बॅग व त्यामध्ये मौल्यवान दागिने, पैसे, मोबाईल एटीएम कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे रिक्षा चालक प्रवीण सुरेश म्हात्रे (रा. पारगाव) यांनी प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात आणून दिले त्याबद्दल पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण यांनी रिक्षाचालक यांचा सत्कार केला त्यावेळी प्रवासी महिला यांना संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची बॅग व मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी महिलेने रिक्षाचालक व पोलिसांचे आभार मानले. तसेच भविष्यात अशाप्रकारे रिक्षाचालक व इतर नागरिक यांच्याकडून प्रामाणिकपणा दिसून आल्यास त्यांना पोलीस प्रशासनाकडून गौरविण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले. सध्याच्या दहशतवादी कारवाई लक्षात घेता एखादी व्यक्ती किंवा प्रवासी संशयित हालचाली दिसून आल्यास किंवा परिसरात बेवारस वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा किंवा नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथे संपर्क साधावा. याबाबत रिक्षाचालक व नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले.