महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आणि अॅक्वाक्राफ्टचा उपक्रम
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/01/Alibag1-1-1024x683.jpg)
अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणार्या अॅक्वाक्राफ्टच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर या तालुक्यातील 22 गावांत ‘जल पे चर्चा’ अभियानाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) ही 2017मध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संस्था असून, महाराष्ट्रात एक हजार आदर्श गाव निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. कॉर्पोरेट क्षेत्र आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने विकासासाठी केल्या जाणार्या प्रयत्नांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एमव्हीएसटीएफने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक-खासगी भागीदारी निर्माण करण्याकरिता मदत केली आहे. त्याअंतर्गत अभियानास नुकताच मुंबईत प्रारंभ झाला. या वेळी नीति आयोगाशी संबंधित अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर आर. रामानन, स्पर्श गंगा अभियानाच्या प्रमुख आरुषी निशंक, आर. डी. नॅशनल कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉ. नेहा जगतानी उपस्थित होत्या. हे अभियान जागतिक जलदिनी संपणार आहे. ग्रे वॉटर मॅनेजमेंट व पाणी बचतीच्या इतर उपायांच्या साहाय्याने पाण्याचे नवे स्रोत तयार करणे, त्यांचे संवर्धन व जलस्रोतांची वाढ या विषयावर अभियानाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एमव्हीएसटीएफ व अॅक्वाक्राफ्ट करीत आहे. जलबचतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे. एमव्हीएसटीएफ आणि अॅक्वाक्राफ्टचे हे अभियान महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांतील 98 तालुक्यांमध्ये राबवले जाणार आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यांतील 22 गावांचा समावेश आहे.
युवकांचा सहभाग
याअंतर्गत जिल्हा स्तरावर तरुणांना आवडणार्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्यात जलशक्ती अभियान (जेएसए) या घटकाची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो (सीएमआरडीएफ) आणि जिल्हा एक्झिक्युटिव्ह या विषयावरील त्यांची मते आणि जलशक्ती अभियानांतर्गत (जेएसए) करण्यात आलेली कामे, आव्हाने आणि या अभियानाचा काय फायदा झाला या गोष्टी सर्वांसमोर मांडणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखवण्यात येणार असून, कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी मुक्त संवादाच्या कार्यक्रमाबरोबरच प्रश्नमंजुषाही आयोजित करण्यात आली आहे. या अभियानात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमव्हीएसटीएफच्या वतीने करण्यात आले आहे.