Breaking News

श्रीवर्धन नगर परिषदेचा अजब कारभार

भिंतीवर काढण्याचे चित्र चक्क पारावर रेखाटले; नागरिकांमध्ये चर्चा

श्रीवर्धन : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काही सन्मानचिन्ह काढून त्याची जाहिरात करण्याचे आदेश नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना श्रीवर्धन नगर परिषदेने सन्मानचिन्हाचे चित्र भिंतीवर काढण्याऐवजी चक्क पाय सोडून बसण्याच्या पारावर रेखाटले आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षण अभियानही सुरू आहे. त्या निमित्ताने काही सन्मानचिन्ह काढून त्याची जाहिरात करण्याचे आदेश नगरविकास खात्याकडून राज्यातील नगरपंचायती व नगर परिषदांना दिले आहेत.

श्रीवर्धन शहरातील दिवेआगर आणि जीवना बंदराकडे जाणार्‍या रस्त्यावर भलेमोठे पिंपळाचे झाड असून त्याच्या सभोवती गोल पार बांधला आहे. काही प्रवासी या पारावर पाय सोडून बसलेले असतात. श्रीवर्धन नगर परिषदेतर्फे या पारावर चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यात सन्मान चिन्हावर तिरंग्यामध्ये असल्याप्रमाणे हिरवा, पांढरा, भगवा रंग आहे. त्याचप्रमाणे अशोक चक्रदेखील काढण्यात आले आहे.

चित्र रंगवण्याचे काम सुरू असताना पत्रकार संतोष चौकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. चित्र भिंतीवर काढण्यास कोणतीही हरकत नाही, परंतु बसण्याच्या जागी हे चित्र काढल्यानंतर त्यावरती कोणी अनवधानाने बसल्यास त्या चिन्हाचा अवमान होण्याचे शक्यता नाकारता येत नाही, पण श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाने या पारावर हे चित्र रंगवून पूर्ण केले आहे. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply