पेण येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
अलिबाग : जिमाका
अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकार्यांनी किरवली टोलनाका (ता. पनवेल) येथे केलेल्या कारवाईत सुमारे 80 लाख रुपये किमतीचा गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करून त्याची वाहतूक करणारे दोन ट्रक ताब्यात घेतले आहेत. खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकार्यांनी पनवेल तालुक्यातील किरवली टोलनाका येथे पाळत ठेवली होती. त्यावेळी टाटा आयशर ट्रक (एमएच-04,एफडी-9953) आणि (एमएच-04, एचवाय-3889) यांचा संशय आल्यावरून त्यांची तपासणी केली. त्यावेळी या दोन्ही ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा 78 लाख 45 हजार 24 रुपये किमतीचा साठा आढळला. तो जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सदरचे दोन्ही ट्रक तळोजा पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई (ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त लं. अ. दराडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बा. औ. शिंदे, सु. ना. जगताप व प्रियंका भंडारकर यांनी कार्यालयातील कर्मचारी प्र. मा. पवार, वरिष्ठ लिपिक ना. द. वस्त, दे. मो. पाटील, म. भि. भगत यांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी वाहनचालक, वाहनमालक व पुरवठादार यांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व भादंवि कलम 328, 188, 273 व 274 अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.