Sunday , February 5 2023
Breaking News

सितार्यांचा संघर्ष

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले विचार निर्भयपणे व्यक्त करण्याचे अधिकार असतात. कुठल्याही क्षेत्रातील कुठल्याही स्तरावरील व्यक्तीने आपल्याला आवडणारी विचारधारा जोपासण्यात काहीही गैर नाही. किंबहुना, तेच लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. परंतु व्यक्त होणे म्हणजे मर्यादा भंग करणे असा होत नाही. नसिरूद्दीन शहा यांनी मात्र मर्यादा भंग केला असेच म्हणावे लागते.

कुठल्याही क्षेत्रात एखाद्या व्यक्तीने नावलौकिक आणि सर्वंकष यश कमावले की समाजात त्याचे स्थान वरच्या श्रेणीत जाते. त्या व्यक्तीने पराकोटीच्या मेहनतीने, कल्पकतेने किंवा कदाचित प्रतिभेच्या जोरावर ते क्षेत्र पादाक्रांत केलेले असते. अशा प्रतिभावंतांना साहजिकच वलयांकित मानले जाते. नसिरूद्दीन शहा आणि अनुपम खेर ही अभिनय क्षेत्रातील दोन आदरणीय व्यक्तिमत्त्वे. दोघांच्याही अभिनय गुणाने भारतातील, नव्हे जगातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या दोन्ही अभिनय सम्राटांनी हिंदी इंग्रजी रंगभूमी, चित्रपटांचा पडदा गेली किमान चार दशके अक्षरश: गाजवला आहे. असे असले तरी नसिरूद्दीन शहा यांनी ज्या क्षेत्रातील आपल्याला काही कळत नाही अशा गोष्टीबाबत निष्कारण टीकाटिपण्णी करून रसिकांचा हिरमोड केला आहे. नसिरूद्दीन शहा यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना अनुपम खेर यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने शाब्दिक कोरडेे ओढले. खेर यांना विदुषक म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अनुपम खेर हे गेली अनेक वर्षे कला क्षेत्रात राजकारणात सक्रिय आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे युक्तिवाद करताना त्यांना आपण अनेकदा पाहिले आहे. आपली उजवी विचारसरणी त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या देखील एक उत्तम अभिनेत्री आणि भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. नसिरुद्दीन शहा यांनी मात्र आजवर वेळोवेळी कोणा ना कोणावर निष्कारण तोंडसुख घेऊन प्रसिद्धी तेवढी मिळवली. आपले राजकीय विचार कायम वैचारिकतेच्या बुरख्याआड ठेवले. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांविरुद्ध त्यांनी शेरेबाजी करून वेळोवेळी खळबळ माजवली. उत्कृष्ट अभिनेता हा जबाबदार विचारवंत असतो असे मानण्याचे कारण नाही. परंतु अनेकदा तारांकित असण्याच्या कैफामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या मर्यादा सोडतात निष्कारण टीकाटिपण्णी करून रसिकांचा रोष ओढवून घेतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांसोबत जाऊन उभी राहिलेली दीपिका पडुकोण हे त्याचे आणखी एक ताजे उदाहरण. ‘छपाकचित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना दीपिकाने जेएनयुला दिलेली भेट महागात पडली हे सहजच दिसून आले. नसिरूद्दीन शहा हे एक नावाजलेले अभिनेते आहेत. परंतु स्वत:ला मिळालेले यश हे आपल्या अभिनय गुणामुळे मिळालेले असून कुठल्याशा विचारसरणीमुळे नाही याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते. अनुपम खेर यांनी अत्यंत संयतपणे पण तरीही सडेतोड असे उत्तर देऊन शहा यांना खडसावले हे योग्यच झाले. फिल्मी सितारे प्रसिद्धी आणि पैशाच्या जोरावर नको त्या उठाठेवी करतात आणि हात पोळून घेतात हेच यातून दिसून येते. भारतातील मतदार हा सुजाण मतदार आहे. समाजातील भलेबुरे त्याला कळत असते. भारतीय मतदार चित्रपटांचा वेडा असला तरी राजकारणात मात्र तोच खरा राजा असतो हे सार्यांनीच लक्षात ठेवलेले बरे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply