मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. आम्ही सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही, अशा शब्दात भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. मनसेच्या भूमिकेचचे स्वागत करताना शिवसेनेवर जोरदार टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगुंटीवार म्हणाले की, विचारामध्ये जेव्हा समानता असते तेव्हा युती होते. शिवसेनेबरोबर आमची युती होती तेव्हा आमच्या विचारामध्ये युती होती मात्र शिवसेनेला सत्तेसाठी काँग्रेसची विचारधारा जवळची वाटायला लागली त्यामुळे ते आमच्यापासून दूर झाले. आता मनसेने देशहित, राष्ट्रहिताचा निर्णय केला आहे. त्यामुळे जे जे समविचारी पक्ष आहेत त्यांना एकत्र येण्यासाठी कुठेही अडचण नसते. मनसेने आज जो भगवा रंग स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला नक्कीच नुकसान होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रभक्तीची जी जिद्द होती. ती आज बदलून राष्ट्रहितापेक्षा स्वहित, देशहितापेक्षा खुर्ची हित असे दृश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे निश्चित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रध्दा ठेवणार्यांच्या मनात द्वंद सुरु असेल. त्यामुळे अशांसाठी मनसे एक व्यासपीठ म्हणून पुढे आलेली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर जोरदार टीका केली. परंतु त्याआधी त्यांनी कौतुकही केले होते ते कसे विसरता येईल. मात्र शिवसेनेने जेवढी टीका सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यावर केली तेवढी टीका तर जगात कोणी केली नसेल. शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी जर सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र येऊ शकतात तर आम्ही भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणत सत्तेपेक्षा सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत झाले. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचे अनावरण केले.