Tuesday , February 7 2023

घाऊक बाजारात मिरची खातेय ‘भाव’

गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 ते 60 रुपयांनी दर वधारले

पनवेल : बातमीदार

पावसाळ्याआधी स्वयंपाकासाठीचा गरम मसाला बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. त्यासाठीची लाल मिरची आणि त्यातील मसाले पदार्थाच्या खरेदीसाठी बाजारात त्या धाव घेतात. यंदा वाशी बाजारात (एपीएमसी) बेडगी आणि काश्मिरी मिरची दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मिरचीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत चढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मिरची पिकालाही बसल्याने मिरचीचा भाव 50 ते 60 रुपयांनी वधारला आहे. मिरचीचा हंगाम 15 दिवस लवकर संपेल, अशी शक्यता घाऊक बाजारातील व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी मिरचीची आवक चांगली झाली होती. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला होता. यंदाचे चित्र थोडे वेगळे आहे. अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे दर वधारतील, असा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला. मार्च महिन्यात मसाल्याचा हंगाम सुरू होतो. बाजारात आता बेडगी आणि काश्मिरी मिरची दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र यंदा दर वाढल्याची माहिती मसाला बाजारातील घाऊक व्यापारी कीर्ती राणा यांनी दिली. वाशी बाजारात सध्या कर्नाटकमधील बेडगी आणि अन्य राज्यांतून काश्मिरी मिरची दाखल होत आहे. रोज चार ते पाच गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मसाल्यात लवंगी मिरच्यांसोबत लालसर रंग येण्यासाठी बेडगी आणि काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो. फेब्रुवारीअखेरीस वा मार्चच्या पहिल्या आठवडयात लवंगी, पांडी, संकेश्वरी मिरच्यांची आवक होते. या मिरच्यांना गृहिणींची पसंती असते. सध्या बाजारात साठवणुकीची लवंगी मिरची उपलब्ध आहे. तरीही फेब्रुवारीअखेरीस दक्षिण भारतातून मिरची दाखल होणार आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply