Tuesday , February 7 2023

कसोटीत विराट पुन्हा अव्वल स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचे स्थान

मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे सारत हे स्थान पटकाविले. विराटने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली 928 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर स्टीव्ह स्मिथ 923 गुणांसह दुसर्‍या स्थानावर सरकला आहे. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या मालिकेतील खराब कामगिरीचा फटका स्मिथला बसला. दुसरीकडे कोहलीने बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी बजावत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.

पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताच्या विराट कोहली व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर आहे. अजिंक्य रहाणेला एका स्थानाचा फटका बसला.

गोलंदाजांमध्ये शमी ‘टॉप 10’मध्ये

गोलंदाजांच्या यादीत भारताच्या मोहम्मद शमी याने टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. 771 अंकासह शमी दहाव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने अव्वल स्थान कायम राखले आहे. अव्वल 10 गोलंदाजांमध्ये शमीव्यतिरिक्त भारताचा जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी, तर रविचंद्रन अश्विन नवव्या स्थानावर विराजमान आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply