मुंबई ः प्रतिनिधी
अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या 15 जूनपर्यंत मान्सून धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. यंदाच्या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल तसेच वार्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात आठ जिल्हे व चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसात खंड पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.
कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्षा आर्द्रता, वार्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर यावर्षी राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. निकषात वार्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही, परभणी येथे पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असून, दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडित वृष्टी राहील. दरम्यान, पश्चिम विदर्भात 95 टक्के पावसाचा अंदाज असून, अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 95 टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भात 98 टक्के पावसाची शक्यता आहे. अशीच स्थिती बुलडाणा जिल्ह्याचीही असेल. नागपूर येथे याच कालावधीत सरासरी 97 टक्के पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी 882 मिमी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सरासरी 1191 मिमी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात यावर्षी 95 टक्के पावसाची शक्यता असून, परभणी जिल्ह्यात सरासरी 815 मिमी सरासरीच्या 95 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. कोकणात 90 टक्के पावसाचा अंदाज आहे. दापोली येथे जून ते सप्टेंबरपर्यंत 3339 मिमी सरासरीच्या 90 टक्के पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात 97 टक्के पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सरासरी 432 मिमी या सरासरीच्या 99 टक्के पावसाची शक्यता आहे. धुळे सरासरी 481 मिमी 97 टक्के, जळगाव सरासरी 639 मिमी 96 टक्के पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रात 95 टक्के पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर सरासरी 705 मिमी 95 टक्के, कराड सरासरी 570 मिमी 96 टक्के, पाडेगाव सरासरी 360 मिमी 97 टक्के, सोलापूर सरासरी 543 मिमी 90 टक्के, राहुरी सरासरी 406 मिमी 95 टक्के, पुणे सरासरी 566 मिमी सरासरीच्या 95 टक्के पावसाची शक्यता आहे.