Sunday , February 5 2023
Breaking News

नागोठण्यातून लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत

नागोठणे : प्रतिनिधी

पेण येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील शंभू पेट्रोलपंपासमोर असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील रूम नं. 4मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या पान मसाल्याचा साठा असल्याची खबर पेणच्या अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्याने प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, सुप्रिया जगताप, प्रियांका भांडारकर, नमुना सहाय्यक मनोहर नागेश वत्स यांच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांच्या सहकार्याने या ठिकाणी धाड टाकून हे घबाड हस्तगत केले. आरोपीने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा  साठा, वितरण व विक्री केली असल्याने त्याच्यासह इतर दोघे तसेच या कामासाठी घर पुरविणार्‍या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अलिबागचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विजयकुमार देशमुख करीत आहेत.

पकडलेल्या मालाचे वर्णन

विमल पान मसाला किंमत – 6,73,200 रुपये

व्ही 1 टोबॅको – 2,20,000 रुपये

आर.एम.डी. पान मसाला – 17,280 रुपये

मेहेक सिल्व्हर पान मसाला – 64,125 रुपये

मिक्सर ऑफ ओडरीफेरस सबस्टनसेस – 24,120 रुपये

पॅराफिन द्रव्य – 2400 रुपये

मॅग्नेशियम कार्बोनेट – 1455 रुपये

रिकामे पाऊच व रोल बंडलाचे बॉक्स व प्लास्टिक गोणी – 16,000 रुपये

सुपारी व कात बारीक करण्यासाठी चक्कीसारखे स्टीलचे मशीन – 6000 रुपये

मोठा व छोटा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा – 3000 रुपये

 एकूण किंमत – 10 लाख 27 हजार 580 रुपये.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply