पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन मार्गिका असून त्यापैकी प्रवाशी बसेस, जड अवजड वाहने डाव्या मार्गीकेमधून न जाता उजव्या मार्गीकेमधून मार्गक्रमण करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतात. त्यामुळे अपघात सत्र वाढते. हे सर्व टाळण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांनी संयुक्तपणे या मार्गावर विशेष मोहिम राबवून संबंधित वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. ही कारवाई महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दिनेश कदम, विनायक यादव, डी. पी. अंडील व जी. पी. माने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मुंबई विभाग यांनी एकत्रित येवून केली आहे. त्यामध्ये मार्गिकेची शिस्त न पाळणे, वेग मर्यादेचे उल्लंघन, द्रुतगती मार्गावर वाहन थांबविण्यास मनाई असताना देखील वाहन थांबविणे अशाप्रकारे वाहतूक नियमाचे वाहन चालक मोठ्या प्रमाणात उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाही, विठाई, हिरकणी या बसेसवर व इतर बसेसवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे लेन कटींग व मोबाईलवर संभाषण तसेच धोकादायकरित्या वाहन चालविणार्या 342 बसच्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेमुळे कार चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढे सुद्धा वेळोवेळी चालू राहणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी दिली.