Breaking News

वायुवेग पथकाची 52 रिक्षांवर कारवाई

पनवेल : बातमीदार : मागील तीन दिवसांपासून पनवेलमध्ये वायुवेग पथकाने 52 रिक्षांवर कारवाई केली आहे, मात्र वायुवेग पथकाची ही कारवाई वेगाने व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रवाशांना प्रवास नाकारणे, मीटरप्रमाणे प्रवास करण्यास नकार देणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, विमा नसणे, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, रिक्षाचालकाचा गणवेश नसणे अशा अनेक तक्रारी आल्यामुळे पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी 1 फेब्रुवारीपासून वायुवेग पथकाच्या माध्यमातून तीन आसनी रिक्षाचालकांवर जोरदार कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. कारवाई करण्याआधी वाहतूक विभागाने पाच दिवसांपूर्वी विशेष पत्रक प्रसिद्ध करून रिक्षाचालकांना सुधारण्याची संधी दिली होती.

पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागात म्हणजेच पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर या चार तालुक्यांमध्ये रस्त्यावर दररोज 15 हजार रिक्षा धावतात. पनवेलमध्ये पनवेल शहर, कामोठे, कळंबोली आदी भागांत नागरिकांना रिक्षा मीटरप्रमाणे नाकारल्या जात असताना 1 फेब्रुवारीपासून करण्यात आलेल्या कारवाईत 1 आणि 2 फेब्रुवारी या दोन दिवशी 37 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. विविध कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 2 फेब्रुवारी रोजी केवळ 15 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे आणि प्रशांत शिंदे यांची दोन पथके स्थापन करून कारवाई केली जात आहे. तीन दिवसांत अवघ्या 52 रिक्षांवर कारवाई केल्यामुळे वेगाने कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

तीन आसनी रिक्षाचालकांसाठी विशेष मोहीम राबवून परिवहन विभागाला 15 हजार रिक्षांपैकी केवळ 52 रिक्षांवर कारवाई करण्यास तीन दिवसांचा अवधी लागत असल्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त कशी येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पनवेलच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कारवाईची आकडेवारी देत ही कारवाई सुरू राहील, अशी माहिती दिली. त्यामुळे पुढील काही दिवसांत तरी कारवाईला जोर येईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तीन आसनी रिक्षांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमून दोन मोटर वाहन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यापेक्षा अधिक अधिकार्‍यांची नेमणूक करता येणे शक्य नाही. तसे केल्यास कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होईल. त्यामुळे ही कारवाई अधिक काळ चालवणे हाच पर्याय असू शकेल. -लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply