पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन व ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारी (दि. 5) करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कुंडेवहाळ येथे महिलांसाठी आयोजित या विशेष आरोग्य तपासणी शिबिरात मासिक पाळीमध्ये महिलांना उद्भवणार्या समस्यांवर लाईफ लाइन हॉस्पिटल पनवेलच्या वैद्यकिय संचालिका डॉ. जयश्री पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच या वेळी कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाअंतर्गत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन, गरोदर महिला व स्तनदा मातांना पोषण आहार आणि कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच दत्तात्रेय पाटील, पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक, उपसरपंच निता दळवी, मानघरच्या सरपंच वंदना पाटील, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगिता भगत, लीना पाटील आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.