हॅमिल्टन : वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 347 धावांचा डोंगर उभा करूनदेखील भारताचा चार विकेट्सनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नाबाद 109 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली. न्यूझीलंडच्या डावात कुलदीपने टेलरचा एक झेल सोडला ज्याचा फटका संपूर्ण संघाला बसला आणि या दौर्यातील पहिला पराभव पाहावा लागला.
भारताकडून रवींद्र जडेजा 23वे षटक टाकत होता. या षटकातील तिसर्या चेंडूवर रॉस टेलरने फटका मारला. टेलरला स्वीप शॉट खेळाचा होता, पण बॅटच्या एजला लागून चेंडू हवेत उडाला. तेव्हा शॉर्ट फाइन लेगला कुलदीप यादव क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. कुलदीपला टेलरचा झेल घेता आला नाही. टेलर तेव्हा अवघ्या 12 धावांवर खेळत होता आणि न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 125 अशी होती.
कुलदीपने हा झेल सोडल्याबद्दल गोलंदाज जडेजादेखील नाराज झाला, तर टेलरने त्याला मिळालेल्या जीवनदानाचा योग्य फायदा घेत संघाला भारताविरुद्धचा पहिला विजय मिळवून दिला. दोन्ही संघांतील दुसरा वनडे सामना ऑकलंड येथे 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.