मुंबई : प्रतिनिधी
आपल्यातील भांडणे व मतभेद विसरून महिलांच्या सुरक्षितेसाठी एकत्र येऊयात असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.
अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला आहे.
काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तर, औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यातील एका महिलेच्या घरात शिरून एकाने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या पीडित महिलेचा बुधवारी रात्री उपचारा
दरम्यान मृत्यू झाला. या घटनांचा उल्लेख अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या घटनांबाबत ऐकून त्रास होत असून आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आवाहन अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव यांना केले आहे.
मागील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने लागू केलेल्या ’मनोधैर्य’ या योजनेतील सवलती हिंगणघाट पीडितेला देण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी केली. महिला आयोगाचे अध्यक्षपद भरण्यात यावे अशी मागणीही अमृता यांनी केली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी
मुख्यमंत्र्यांना केले आहे. मागील काही महिन्यात अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने केली होती. त्यानंतर अमृता यांनी गुरुवारी महिला सुरक्षितेच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव यांना आवाहन केले आहे.