पेण : प्रतिनिधी
सीएफआय, बीएनवाय व एम्पॉवर तसेच खारपाडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा गावात नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एकूण 49 किलो प्लास्टिक गोळा करून गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली.
आयबीएनच्या चेअरपर्सन हेगे मॅग्नुस्सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमिला स्कॅरे, छायाचित्रकार हल्लवर जोहोन्सन, सीएफआयचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख, सीएफआयचे अश्विनी म्हात्रे, सुरेश पाटील, खारपाडा सरपंच रश्मी भगत, दयानंद भगत यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक व ग्रामस्थ या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
डॉ. किशोर देशमुख यांनी प्लास्टिक आपल्यासाठी किती धोकादायक आहे, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी सीएफआय, बीएनवाय व एम्पॉवर यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा येथे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात आले. केंद्राची सर्व जबाबदारी दिपा दिलीप घरत यांना देण्यात आली. सदर प्लास्टिक (स्वच्छ व नरम प्लास्टिक, स्वच्छ व धुतलेल्या प्लास्टिक बाटल्या, ई.) 35 रुपये प्रति किलो दराने घेण्याचे ठरले.
या स्वच्छता अभियानामुळे व प्लास्टिक कचरा संकलन केंद्रामुळे खारपाडा तसेच आजुबाजूच्या गावातीलही कचरा कमी होण्यास मदत होईल व गाव स्वच्छ व प्लास्टिक मुक्त होईल, असा विश्वास डॉ. किशोर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.