महाड : प्रतिनिधी
आजच्या युगात शिक्षण हा व्यवसाय झाला असून, या बाजारात बाल संस्कार विद्या मंदिर या संस्थेने कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा वेगळा आदर्श जगासमोर ठेवला असल्याचे मत पत्रकार महेश शिंदे यांनी मंगळवार (दि. 11) येथे व्यक्त केले.
महाड तालुक्यातील कोकरे येथील बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमात महेश शिंदे बोलत होते. पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण ओळखून त्यांची शिक्षणाची पुढील दिशा ठरवावी, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील गरीबांना खाजगी शाळांची भरमसाठ फी परवडत नाही. सकपाळ सरांनी रायगड विभागातील ग्रामीण भागात बाल संस्कार विद्या मंदिर शाळेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण अत्यल्प फीमध्ये उपलब्ध करून दिले आहे, असे सांगून महेश शिंदे यांनी सकपाळ बंधुंना धन्यवाद दिले. सरकारी शाळा बंद होत असताना बाल संस्कार विद्या मंदिर शाळेच्या रुपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा आधार निर्माण झाला असल्याचे जि. प. सदस्य जितेंद्र सावंत म्हणाले. मुख्याध्यापक अनिल सकपाळ, शिक्षण समितीचे उपाध्यक्ष कॅ.तानाजी साळवी, डॉ. मच्छींद्र सकपाळ, मंगेश शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यावेळी उपस्थित होते.