अलिबाग : प्रतिनिधी


अलिबाग शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने तसेच नरेंद्र महाराज सांप्रदायच्या वतीने शनिवारी (दि.6) सकाळी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. रघुजीराजे आंगे्र, उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे आदी या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरात महावीर चौक, जोगळेकर नाका, बालाजी नाका, ठिकरूळ नाका आदी ठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. नववर्षाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या शोभायात्रेची जोगळेकर नाका येथे सांगता झाली.
स्वागतयात्रेत स्त्री-पुरूष पारंपरिक वेशात आणि डोक्यावर भगवे फेटे बांधून आणि हातात भगवे झेंडे घेवून सहभागी झाले होते. पारंपारिक वाद्यांबरोबरच यावेळी ढोलपथकांचा सहभाग हे आकर्षण ठरले.
रायगड जिल्ह्यात अलिबागसह रेवदंडा, चौल, महाड, कर्जत, रोहा, पेण याठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याचा सण घरोघरी मंगलमय वातावरणात साजरा झाला. नववस्त्राची गुढी उभारून दारावर तोरण लावण्यात आले होते. सुवासिनींनी गुढीची पूजा केली. सर्वांनी एकमेंकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत कडुनिंब व गुळ वाटण्यात आला. घरोघरी पुरणपोळी व श्रीखंडपुरी असा गोडाचा बेत होता.
पूजेसाठी लागणार्या झेंडू फुलांना बाजारात मोठी मागणी होती. दरम्यान पाडव्याचा शुभमुहूर्त साधत सोने, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच गृहोपयोगी वस्तुंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. अनेकांनी नवीन दुकांनाचे उद्घाटन करीत मुहूर्त साधला.