कर्जत ़़: बातमीदार
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेला पूल 2018 मध्ये कोसळला आहे. येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेल्या या पुलाच्या बांधकामाबद्दल रायगड जिल्हा परिषद सातत्याने चुकीची माहिती देत आहे. दरम्यान, नेरळमधील पूल कोसळून दोन वर्षे पूर्ण होत आली तरी पुलाचे बांधकाम सुरु झाले नाही, त्यामुळे सलग तिसरा पावसाळादेखील पुलाअभावी जाण्याची शक्यता आहे.
नेरळ गावातील गणेश विसर्जन घाटाच्याखालील बाजूस ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला पूल मार्च 2018 मध्ये कोसळला आहे. त्या पुलाची निर्मिती रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करावी, यासाठी गेली दोन वर्षे सातत्याने स्थानिक पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. तब्बल दोनवेळा कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले, मात्र पुलाचे काम काही सुरु झाले नाही. पहिल्या वेळी भूमिपूजन केले, त्या नंतर पुलाची जागा बदलण्यात आली. त्यामुळे लाईन आऊट करूनदेखील पुलाचे काम काही पुढे सरकले नव्हते. जागा बदलल्याने पुलाच्या कामाचे अंदाजपत्रकदेखील बदलण्यात आले. बदललेल्या नवीन अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी पुन्हा काही महिने लागले होते.
नवीन पूल ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे, त्या ठिकाणी एका बाजुला नेरळ ग्रामपंचायतीची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची एक शेड पुलाचे बांधकाम करताना तोडावी लागणार आहे. त्यामुळे तेथे दोनच शेड उपलब्ध राहतील. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी तात्काळ नवीन स्मशानभूमी शेड उभा करण्याची गरज आहे.
या पुलाचे काम पावसाळा सुरु होण्याआधी पुर्ण करायचे असल्यास जिल्हा परिषदेला धावपळ करावी लागेल. नाहीतर पुन्हा एकदा पावसाळा असाच जाईल आणि पुला अभावी मोहाचीवाडी आणि परिसरातील आदिवासी वाड्यामधील रहिवाशांना पुन्हा एकदा दूर अंतरावरून आपल्या घरी परतावे लागेल.
पूल कोसळल्यापासून आम्ही नवीन पूल व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहोत, मात्र आजतागात पुलाचे बांधकाम झाले नाही. जिल्हा परिषदेने आतापर्यंत तीन वेळा पुलाची जागा बदलली आहे. त्यामुळे जि. प.ला या पुलाची निर्मिती करायची नाही, असे वाटत असून आमच्या भागातील रहिवाशांना सलग तिसर्या पावसाळ्यात दूरचा फेरा मारून घरी जावे लागण्याची शक्यता आहे.
-गोरख शेप, स्थानिक कार्यकर्ता, नेरळ
जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणाकडून या पुलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत.पुढील दोन महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
-प्रल्हाद गोपणे, प्रभारी उपअभियंता,
रायगड जि.प. बांधकाम विभाग