नगरसेवक संजय भोपी यांनी जपली सामाजिक बांधिलकी
पनवेल ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. पनवेल मनपा क्षेत्रातील इतर दुकानांना दोन दिवस उघडण्यास मुभा देण्यात आली असली तरी केस कर्तनालय अद्यापही बंदच आहेत. परिणामी या ठिकाणी काम करणार्या नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरीब आणि अडचणीत सापडलेल्या खांदा वसाहतीतील नाभिक समाजातील व्यक्तींना सभापती संजय भोपी यांनी मदतीचा हात दिला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना या वैश्विक संकटामुळे उद्योजक, व्यावसायिक, वाहतूकदार त्याचबरोबर खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार अडचणीत आले आहेत, परंतु ज्यांचे हातावर पोट आहे अशा कष्टकरी मंडळींवर तर उपासमारीची वेळ आली आहे. इकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यात नाभिक समाजातील बांधवांची अवस्था अतिशय बिकट आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात इतर दुकानांना अटी आणि शर्ती ठेवून दोन दिवस परवानगी देण्यात आली आहे, परंतु केस कर्तनालय अद्यापही लॉकडाऊन आहेत. त्यापासून कोरोना संसर्ग होण्याची भीती अधिक असल्याने त्यांना केंद्र-राज्य तसेच स्थानिक प्रशासनाने मुभा दिली नाही.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतरच त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जे थोडे काही पैसे होते हे संपल्याने आता यापुढे करायचे काय, असा प्रश्न अनेक नाभिक बांधवांसमोर उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी खांदा वसाहतीतील अशा नाभिक बांधवांना संपर्क कार्यालयासमोर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
त्याचबरोबर संबंधितांना मास्क आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्या देण्यात आल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभापती संजय भोपी यांच्यासह कामगार नेते मोतीराम कोळी, अभिषेक भोपी, नवनाथ मेंगडे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. नाभिक समाजाच्या वतीने या मदतीबद्दल आभार मानण्यात आले.