मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज; राऊतांचा दुजोरा
मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नाना पटोले यांच्या हाती दिल्याने विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
काँग्रेसने विधानसभेचे अध्यक्षपद असलेल्या पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न माध्यमांकडून संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी भाष्य केले. नक्कीच ती भूमिका आहे. कारण अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असे आम्ही ‘सामना’त म्हटले आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असते. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्याने पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांचे बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात, असे राऊत यांनी म्हटले आहे.