पनवेल : वार्ताहर
गुढीपाडवा हा वर्षात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो तसेच आजचा दिवस हा मराठी नववर्ष दिवस म्हणूनसुद्धा मानला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे पनवेलकरांनी या दोन्ही सणांचे स्वागत घरात बसूनच केले. गुढीपाडवा व मराठी नववर्ष म्हणजे आनंदाचा उत्सवच असतो. या निमित्ताने घराघरातून गुढ्या उभारणे, शोभायात्रा, मिरवणुका यात तरूणांचा उत्साह दुपारच्या वेळेस घरी गोडाधोडाचे जेवण तर सायंकाळी सपत्नीक व कुटूंबासह सोन्यासह इतर वस्तूंची खरेदी असा दिवस आनंदात घालवण्याची परंपरा आहे. या दिवशी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. नवीन कार्याचा शुभारंभसुद्धा याच मुहूर्तावर केला जातो. परंतु संपूर्ण जगाला पडलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आज मितीला जनता घरात बसूनच हा सण साजरा करीत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा दिलेला लॉकडाऊन त्यामुळे घरात बसण्याचे केलेले आवाहन यातूनच अनेक उद्योगधंदे बंद आहेत. सराफपेठ बंद आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक आजच्या दिवशी नवीन बांधकामाचा शुभारंभ करतात परंतु तोसुद्धा त्यांना आज करता आला नाही. बाजारपेठेत भयाण शांतता असून पुढचे दिवस याहून कठीण असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सर्वांनी थंडपणानेच सणाचे स्वागत केले.